पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या उपांत्य लढतीत 4-1 फरकाने बाजी
पुरुष गटातील फुटबॉल स्पर्धेत बुधवारची ब्राझील-मेक्सिको यांच्यातील ऑलिम्पिक सेमी-फायनल लढत ही 2012 लंडन ऑलिम्पिक फायनलची ‘रि-मॅच’ होती. त्यावेळी ब्राझीलला 1-2 फरकाने पराभव पत्करावा लागला होता. यंदा मात्र ब्राझीलने त्या पराभवाचा वचपा काढत पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-1 अशी बाजी मारली. आता सुवर्णपदकासाठी होणाऱया लढतीत ब्राझीलचा मुकाबला स्पेनविरुद्ध होईल. अन्य एका उपांत्य लढतीत स्पेनने जपानचा 1-0 अशा निसटत्या फरकाने धुव्वा उडवला.
ब्राझीलने पहिल्या उपांत्य लढतीत मजबूत सुरुवात केली होती. रेग्युलेशन टाईममधील उत्तरार्धात रिचार्लिसनने गोलकोंडी फोडण्याची नामी संधी गमावली. इतका अपवाद वगळता ब्राझीलचे वर्चस्व राहिले. मात्र, यानंतरही निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्याने पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला गेला आणि त्यात ब्राझीलने 4-1 अशी बाजी मारली.
क्लब स्तरावर रियल माद्रिदकडून खेळणारा रेनियर जिजस प्रारंभी राखीव खेळाडूंमध्ये होता. मात्र, नंतर 72 व्या मिनिटाला तो क्लॉडिन्होच्या जागी मैदानात उतरला. रेनियरसाठी संघ 3-1 अशा फरकाने आघाडीवर असताना सर्वात मोक्याचा क्षण आला आणि त्यावेळी त्याने गोल करण्यात अजिबात कसून केली नाही व ब्राझीलचे फायनलचे तिकीट निश्चित झाले.
ब्राझीलचा संघ या इव्हेंटमध्ये विद्यमान चॅम्पियन असून येथे सुवर्ण कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर स्पेन ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला युरोपियन देश ठरण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसऱया उपांत्य लढतीत स्पेनने मार्को असेन्सियोच्या कर्लिंग स्ट्राईकवरील गोलसह यजमान जपानला 1-0 असे नमवत अंतिम फेरीत धडक मारली. असेन्सियोने 115 व्या मिनिटाला हा सामन्यातील एकमेव गोल केला होता. दोन्ही उपांत्य सामन्यातील पराभूत संघ मेक्सिको व जपान यांच्यात आता कांस्यपदकासाठी लढत होईल. ही कांस्यपदकाची लढत शुक्रवारी तर सुवर्णपदकाची निर्णायक लढत शनिवारी खेळवली जाणार आहे.