वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शस्त्रास्त्र निर्यात करण्याप्रकरणी भारत एकेकाळी खूपच पिछाडीवर होता, परंतु आता भारतातूनही मोठय़ा प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यात होतेय. मेक इन इंडियामुळे हे शक्य झाले आहे. सद्यकाळात भारत अनेक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीप्रकरणी आत्मनिर्भर होण्यासह त्यांची निर्यातही करू लागला आहे. तर दुसरीकडे शस्त्रास्त्रांची आयात कमी झाली आहे. 2016 पासून आतापर्यंत शस्त्रास्त्रांची निर्यात सुमारे 6 पटीपर्यंत वाढली आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हा बदल दिसून येत आहे. 2014-15 मध्ये शस्त्रास्त्रांची निर्यात सुमारे 1,941 कोटी रुपयांची होती. 2021-22 मध्ये हा आकडा वाढून 11,607 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील काही वर्षांमध्ये शस्त्रास्त्रांची आयात 30 टक्क्यांपेक्षा अधिकने कमी झाली आहे. म्हणजेच आता आपला देश पूर्वीच्या तुलनेत अधिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करत ती अनेक देशांना विकत आहे.
सद्यकाळात भारताकडून शस्त्रास्त्रांची निर्यात अत्यंत कमी देशांनाच होत आहे. भारत शस्त्रास्त्र निर्यातीप्रकरणी जगात 24 व्या क्रमांकावर आहे. भारताकडून शस्त्र खरेदी करणाऱया देशांमध्ये म्यानमार, श्रीलंका आणि मॉरिशस यासारख्या देशांचा समावेश आहे. 2016-20 ची आकडेवारी पाहिल्यास प्रमुख जागतिक पुरवठादार रशिया (46 टक्के), फ्रान्स (18 टक्के), इस्रायल (13 टक्के) आणि अमेरिका हे देश होते. तर आघाडीच्या आयातदारांमध्ये सौदी अरेबिया (11 टक्के), भारत (9.5 टक्के), इजिप्त (5.8 टक्के) यासारखे देश होते. पाकिस्तान या यादीत 10 व्या क्रमांकावर होता.
शस्त्रास्त्र निर्याती वेगाने वाटचाल
सरकारकडून शस्त्रास्त्रांची निर्यात वाढविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. शस्त्रास्त्रांची निर्यात वाढविण्यात ऑर्डिनेन्स फॅक्ट्री बोर्ड आणि त्याच्या 41 प्रकल्पांना सार्वजनिक क्षेत्रातील 7 संरक्षण कंपन्यांशी जोडले गेल्याने मदत मिळाल्याचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लोकसभेत लेखी उत्तरादाखल म्हटले आहे. जानेवारीमध्ये भारताने फिलिपाईन्ससोबत ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा करार केला असून तो 2,770 कोटी रुपयांच आहे. याच व्यवहारामुळे इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यासारख्या आशियाई देशांमध्येही भारतीय शस्त्रास्त्रांच्या निर्यातीचा मार्ग मोकळा होणार आहे. भारत सध्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातसोबत ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्यातीसंबंधी चर्चा करत आहे. तसेच या देशांसोबत आकाश हवाई सुरक्षा क्षेपणास्त्रांबद्दल बोलणी सुरू आहेत.