5 वर्षांमध्ये 71 हजार कोटींच्या भारतीय उत्पादनांची निर्यात करणार : जेफ बेजोस भारत दौऱयावर, छोटय़ा व्यावसायिकांसाठी गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुमारे 8.30 लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह जगातील सर्वात धनाढय़ व्यक्ती ठरलेले जेफ बेजोस भारत दौऱयावर आहेत. अमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफे बेजोस यांनी दिल्ली येथे व्यावसायिकांसाठी आयोजित ‘अमेझॉन संभव’ कार्यक्रमात भारतासंबंधी मोठय़ा घोषणा केल्या आहेत. 2025 पर्यंत अमेझॉन 10 अब्ज डॉलर्स (71 हजार कोटी रुपये) मूल्याच्या मेक इन इंडिया उत्पादनांची निर्यात करणार आहे. तसेच भारतात छोटय़ा आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिकांना डिजिटलाईज्ड करण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सची (7100 कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याचे बेजोस म्हणाले.
भारताचा उत्साह, ऊर्जा आणि येथील लोक विशेष असून येथे लोकशाही नांदत आहे. चालू शतक भारताचे ठरणार आहे. 21 व्या शतकात भारत-अमेरिका आघाडी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम न समजणारा घोडचूक करत आहे. मागील 10-20 वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामांची वस्तुस्थिती समजण्यास लोकांनी गांभीर्य दाखविले नाही. या मुद्दय़ावर जगभरातील लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. अमेझॉन 2030 पर्यंत 100 टक्के शाश्वत वीजेचा (सस्टेनेबल इलेक्ट्रिसिटी) वापर करू लागणार आहे. कंपनीने अलिकडेच 1 लाख ईलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचा निर्णय घेतला असून जूनपर्यंत प्लास्टिकचा वापर बंद करणार असल्याचे बेजोस म्हणाले.
एका यशाने होते मोठी भरपाई
अपयशांसाठी अमेझॉन जगातील सर्वात चांगले ठिकाण आहे, कारण अपयशांचा अत्यंत अधिक अभ्यास करतो. अपयश दोन प्रकारचे असते. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यातून आम्हाला काहीतरी शिकायला मिळते आणि प्रयोग करण्याची क्षमता प्रदान करते. दुसऱया प्रकारचे अपयश काम आणि उत्कृष्टतेसबंधी असते आणि यापासून वाचणे गरजेचे आहे. या प्रकारातूनही धडा घेतला जावा पण अशाप्रकारचे अपयश खराब असते हे मान्य केले जावे. एक यश आणि एक विजेता कित्येक अपयशांची भरपाई करू शकतो, असे उद्गार बेजोस यांनी काढले आहेत.
..तर सॉफ्टवेअर प्रोग्रामर
1994 मध्ये न्यूयॉर्कच्या एका कंपनीत काम करत असताना इंटरनेटचा वेगाने प्रसारत होत असल्याचे जाणवले आणि यातूनच ऑनलाईन पुस्तक विक्रीची कल्पना सुचली. स्वतःच्या वरिष्ठांसमोर ही कल्पना मांडली असता त्यांनी चांगली नोकरी नसलेल्या व्यक्तीसाठी ती अधिक उत्तम ठरणार असल्याचे सांगितले. त्याप्रसंगी मनात अनेक शंका होत्या, पश्चातापाची वेळ येऊ नये असे वाटत होते. पण प्रयत्न न केल्यास सदैव पश्चाताप करावा लागणार असल्याचे उमगल्यावर कल्पनेचा पाठलाग केल्याचे बेजोस म्हणाले. कल्पनेला यश मिळाले नसते तर सॉफ्टवेअर प्रोग्रामर होऊन अत्यंत आनंदी राहिलो असतो, असे त्यांनी म्हटले आहे.
पतंग उडविण्याचा आनंद
अमेझॉन परिषदेपूर्वी बेजोस यांनी दिल्ली येथील मुलांसोबत पतंग उडविण्याचा आनंद घेतला आहे. एका मुलीने त्यांना पंतग उडविण्याचा अनुभव आहे का असे विचारले असता बेजोस यांनी लहानपणी पतंग उडवायचो, असे उत्तर दिले आहे. लहान मुलांनी पतंग उडविण्याचे चांगले धडे दिल्याचे म्हणत बेजोस यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
अमेझॉनच्या यशाचे रहस्य
सहकाऱयांची भरती होतच रहावी, तुम्हाला काहीतरी नवं शिकवू शकतील असे लोक जोडले जावेत. अमेझॉनच्या यशामागे हेच रहस्य आहे. मागील 25 वर्षांमधील वाटचाल माझ्या अपेक्षेहून उत्तुंग ठरली आहे. पॅकेज पोहोचविण्याचे काम करण्याचे आणि पुस्तकांच्या विक्रीचे दिवस मला आजही आठवतात. त्या काळात कंपनी विकण्याचा विचार चालविला होता. पण केवळ एक पाऊल पुढे टाकल्याने स्थितीच पालटली असल्याचे बेजोस यांनी भारतीय व्यावसायिकांना संबोधित करताना म्हटले आहे.