राजस्थान रॉयल्सवर 8 गडी व 70 चेंडूंचा खेळ राखून एकतर्फी विजय
शारजाह / वृत्तसंस्था
जिम्मी नीशम (3-12) व सामनावीर नॅथन कोल्टर-नाईलच्या (4-14) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे सैरभैर झालेल्या राजस्थान रॉयल्सचा एकतर्फी धुव्वा उडवत मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ब्लॉकबस्टर विजय कसा असतो, याची चांगलीच प्रचिती दिली. मुंबई इंडियन्सने राजस्थानला 20 षटकात 9 बाद 90 अशा किरकोळ धावसंख्येवर रोखले आणि त्यानंतर अवघ्या 8.2 षटकात 2 बाद 94 धावा फटकावत संस्मरणीय विजय संपादन केला. या विजयासह मुंबई इंडियन्सच्या प्ले-ऑफमध्ये धडक मारण्याच्या आशाअपेक्षा खऱया अर्थाने आणखी उंचावल्या आहेत.
नीशम व कोल्टर नाईल यांनी एकत्रित 8 षटकांत अवघ्या 26 धावांमध्येच राजस्थानचे 7 फलंदाज गारद केले आणि इथेच मुंबईच्या विजयाची भरभक्कम पायाभरणी झाली. पाचवेळा चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबईने नंतर लवकरच विजय खेचून आणला.
25 चेंडूत नाबाद 50 धावांची धडाकेबाज खेळी साकारणाऱया इशान किशनला सूर सापडला, हे मुंबईच्या विजयातील आणखी एक वैशिष्टय़ ठरले. विजयासाठी 91 धावांचा पाठलाग करताना रोहितने पहिल्याच षटकात 14 धावा वसूल करुन दिल्या. त्यानंतर इशान किशनने दुसरे पूर्ण षटक निर्धाव घालवले. पण, नंतर जम बसल्यानंतर तो राजस्थानच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडला आणि त्यानेच 11.4 षटकांचा खेळ बाकी राखत विजय संपादन करुन देण्यात सिंहाचा वाटाही उचलला. इशानने 5 चौकार व 3 षटकार फटकावताना चौफेर फटकेबाजी केली.
नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय अतिशय यशस्वी ठरला. युएईत या दुसऱया टप्प्यातील पहिला सामना खेळणाऱया नीशमने भेदक गोलंदाजी साकारली. चेंडू सहजपणे बॅटवर येत नसल्याचा मुंबईच्या गोलंदाजांनी याचा पुरेपूर लाभ घेतला. जसप्रित बुमराहने देखील (2-14) महत्त्वाच्या क्षणी बळी घेतले.
राजस्थान 1 बाद 41 वरुन 5 बाद 50!
राजस्थान रॉयल्सने या लढतीत 1 बाद 41 अशी दमदार सुरुवात केली होती. पण, अवघ्या 4 षटकांच्या अंतरात त्यांची अचानक 5 बाद 50 अशी दाणादाण उडाली आणि यातून ते शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत. यशस्वी जैस्वाल (12), संजू सॅमसन (3), शिवम दुबे (3), ग्लेन फिलीप्स (4), राहुल तेवातिया (12) अपयशी ठरले आणि यानंतर राजस्थानसमोर शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. इव्हिन लुईसने सर्वाधिक 24 धावा केल्या.
धावफलक
राजस्थान रॉयल्स ः इव्हिन लुईस पायचीत गो. बुमराह 24 (19 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), यशस्वी जैस्वाल झे. इशान किशन, गो. कोल्टर-नाईल 12 (9 चेंडूत 3 चौकार), संजू सॅमसन झे. जयंत यादव, गो. नीशम 3 (6 चेंडू), शिवम दुबे त्रि. गो. नीशम 3 (8 चेंडू), ग्लेन फिलीप्स त्रि. गो. कोल्टर-नाईल 4 (13 चेंडू), डेव्हिड मिलर पायचीत गो. कोल्टर-नाईल 15 (23 चेंडू), राहुल तेवातिया झे. इशान, गो. नीशम 12 (20 चेंडू), श्रेयस गोपाल झे. इशान, गो. बुमराह 0 (1 चेंडू), चेतन साकरिया त्रि. गो. कोल्टर-नाईल 6 (11 चेंडूत 1 चौकार), कुलदीप यादव नाबाद 0 (4 चेंडू), मुस्तफिजूर रहमान नाबाद 8 (7 चेंडूत 1 षटकार). अवांतर 3. एकूण 20 षटकात 9 बाद 90.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-27 (जैस्वाल, 3.4), 2-41 (इव्हिन, 5.3), 3-41 (सॅमसन, 6.1), 4-48 (शिवम दुबे, 8.3), 5-50 (फिलीप्स, 9.4), 6-71 (तेवातिया, 14.6), 7-74 (श्रेयस गोपाल, 15.6), 8-76 (मिलर, 16.4), 9-82 (साकरिया, 18.4).
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट 4-0-24-0, जयंत यादव 2-0-17-0, जसप्रित बुमराह 4-0-14-2, नॅथन कोल्टर-नाईल 4-0-14-4, जिम्मी नीशम 4-0-12-3, केरॉन पोलार्ड 2-0-9-0.
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. जैस्वाल, गो. साकरिया 22 (13 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), इशान किशन नाबाद 50 (25 चेंडूत 5 चौकार, 3 षटकार), सुर्यकुमार यादव झे. बदली खेळाडू (लोमरोर), गो. मुस्तफिजूर 13 (8 चेंडूत 3 चौकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 5 (6 चेंडू). अवांतर 4. एकूण 8.2 षटकात 2 बाद 94.
गडी बाद होण्याचा क्रम ः 1-23 (रोहित, 3.2), 2-56 (सुर्यकुमार, 5.4).
गोलंदाजी ः मुस्तफिजूर रहमान 2.2-0-32-1, चेतन साकरिया 3-1-36-1, श्रेयस गोपाल 1-0-9-0, कुलदीप यादव 2-0-16-0.
प्ले-ऑफकरिता मुंबईसमोर काय असतील समीकरणे?
पाच वेळचे चॅम्पियन्स मुंबई इंडियन्सने अवघ्या 8.2 षटकात धडाकेबाज विजय संपादन करत 12 गुणांवर झेप घेतली. पण, त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांची धावसरासरी -0.048 पर्यंत सुधारली. मुंबईसाठी शिल्लक चेंडूच्या निकषावर (70) देखील हा सर्वात मोठा विजय ठरला. मात्र, यानंतरही एकीकडे, केकेआरने राजस्थानविरुद्ध पराभूत व्हावे, अशी अपेक्षा मुंबईला करावी लागणार आहे. केकेआर पराभूत झाल्यास मुंबईला हैदराबादविरुद्ध फक्त विजय मिळवणे पुरेसे ठरेल. केकेआरने राजस्थानला नमवले तर मात्र मुंबईला सरस धावगतीसाठी हैदराबादविरुद्ध लढतीत किती फरकाने जिंकावे लागेल, याचे समीकरण नंतर निश्चित होणार आहे.
शेवटच्या एका जागेसाठी अद्याप 3 संघ दावेदार!
यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्स (20), चेन्नई सुपरकिंग्स (18) व आरसीबी (16) या 3 संघांनी आतापर्यंत आपले स्थान निश्चित केले आहे. चौथ्या व शेवटच्या जागेसाठी मात्र केकेआर (12), मुंबई इंडियन्स (12), पंजाब किंग्स (10) या 3 संघात पुढील 3 दिवस कमालीची चुरस असणार आहे. पंजाबने उद्या चेन्नईला नमवले तर ते ही 12 गुणांवर येतील आणि अशा परिस्थितीत केकेआर, मुंबई व पंजाब यांच्यात बरोबरी होऊ शकते. चौथ्या स्थानासाठी एकापेक्षा अधिक संघ बरोबरीत राहिले तर धावसरासरीचा निकष अंमलात आणला जाईल आणि सरस धावसरासरी असणारा संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरणारा चौथा संघ असेल.
शुक्रवारीच ठरणार प्ले-ऑफमधील चौथा संघ!
मुंबईचा संघ आता शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात लढणार आहे. शुक्रवारीच यंदाच्या आयपीएल हंगामातील साखळी फेरीची सांगता होईल व प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता असेल, हे देखील त्याच दिवशी निश्चित होणार आहे. बदलत्या समीकरणाचा कोणालाही फायदा-तोटा होऊ नये, यासाठी शेवटच्या दिवशीचे दोन्ही सामने एकाच वेळी, म्हणजे सायंकाळी 7.30 वाजता खेळवले जाणार आहेत.
उर्वरित सामन्यांची रुपरेषा
तारीख / सामना / ठिकाण / वेळ
6 ऑक्टोबर / आरसीबी वि. सनरायजर्स हैदराबाद / अबु धाबी / सायं. 7.30
7 ऑक्टोबर / चेन्नई सुपरकिंग्स वि. पंजाब किंग्स / दुबई/ दुपारी 3.30 वा.
7 ऑक्टोबर / केकेआर वि. राजस्थान रॉयल्स / शारजाह / सायं. 7.30 वा.
8 ऑक्टोबर / सनरायजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स / सायं. 7.30 वा.
8 ऑक्टोबर / आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स / सायं. 7.30 वा.