केरळसाठी नावे घोषित, पश्चिम बंगालमध्ये चार खासदारांना तिकीट
नवी दिल्ली, कोलकाता / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह 4 विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आले आहे. तर देशात अनेक शहरांमध्ये मेट्रो रेल्वेची बांधणी करणारे ई. श्रीधरन यांना केरळच्या पलक्कड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
केरळमध्ये भाजप 140 पैकी 115 जागा लढविणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांसाठी दिल्या जाणार आहेत. या 115 पैकी 112 उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आणखी 17 नावांची घोषणा करण्यात आली. पश्चिम बंगालच्या पहिल्या दोन टप्प्यांसाठी भाजपचे उमेदवार यापूर्वीच ठरविण्यात आले आहेत. रविवारी तिसऱया व चौथ्या मतदान टप्प्यांसाठी एकंदर 63 उमेदवारांना तिकिटे देण्यात आली.
खुशबू सुंदर यांना उमेदवारी
तामिळनाडूत प्रसिद्ध चित्रपट नायिका खुशबू सुंदर यांना थाऊजंड लाईटस् मतदारसंघातून पक्षाचे तिकीट मिळाले आहे. या राज्यात भाजपची अद्रमुकशी युती असून पक्ष 21 जागा लढवित आहे. राज्य भाजपच्या महिला संघटनेच्या अध्यक्षा वनाथी श्रीनिवासन यांनाही कोईंबतूर मतदारसंघातून सुप्रसिद्ध सिनेस्टार कमल हासन यांच्या विरोधात मैदानात उतरविण्यात आले आहे.
चार खासदार उमेदवार
पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार बाबुल सुप्रियो यांना टॉलिगंज मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. तर खासदार निशीथ प्रामाणिक यांना दिनहाटा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार लॉकेट चॅटर्जी यांना चुनचुरा येथून तर राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांना तारकेश्वर येथून भाजपची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
अनेक मान्यवरांना संधी
पश्चिम बंगालच्या भाजपच्या यादीत केंद्र सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांना तिकीट देण्यात आले आहे. अलिपरूदुआर हा त्यांचा मतदारसंघ आहे. राज्यात पक्षाच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱया आणखी काही मान्यवरांनाही नंतरच्या टप्प्यांमध्ये उमेदवारी देण्यात येणार आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काही आमदारांनाही तिकीट दिले जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये विजय निश्चित !
पश्चिम बंगालमध्ये भाजपची लाट असून ममता बॅनर्जी यांचा पराभव निश्चित आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले. ते राज्यात प्रचारासाठी आले आहेत. या राज्यात भ्रष्टाचार आणि धाकदपटशा यांचेच राज्य असून तृणमूलचा पराभव झाल्याखेरीज परिस्थिती सुधारणार नाही, याची लोकांना खात्री पटली आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. खासदार स्वपन दासगुप्ता यांनीही ममता बॅनर्जींच्या ‘सिंडिकेट राज’चा यावेळी पराभव होणार असल्याचा अंदाज व्यक्त करत तृणमूलच्या भ्रष्टाचारावर टीका केली.
काँग्रेसचे 86 उमेदवार
केरळसाठी काँगेसने आपल्या 86 उमेदवारांची घोषणा रविवारी केली. माजी मुख्यमंत्री ओमेन चांडी, विधानसभेतील विद्यामान विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला, तसेच दिवंगत मुख्यमंत्री के. करूणाकरन यांचे पुत्र के. मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरलीधरन नेमोम मतदारसंघात लढणार असून हा मतदारसंघ सध्या भाजपच्या एकमेव आमदाराच्या ताब्यात आहे.
डीएमकेचा आमदार भाजपमध्ये
तामिळनाडूत डीएमकेचे सध्याचे आमदार पी. सर्वानन यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या पक्षात आपल्याला चांगली वागणूक मिळाली नाही. जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मनमानी करतात पण पक्षनेतृत्व लक्ष देत नाही, या कारणास्तव आपण पक्षत्याग करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.