उद्यापासून प्रवाशांसाठी खुले – दुसऱया टप्प्यातील योजना
प्रतिनिधी / बेंगळूर
संक्रांतीदिनीच बेंगळूरवासीयांना खूशखबर मिळाली आहे. नम्म मेट्रो रेल्वे योजनेच्या दुसऱया टप्प्यातील (ग्रीन लाईन) कनकपूर रोडवरील यलचेनहळ्ळी ते सिल्क इन्स्टिटय़ूट (अंजनापूर) स्थानकापर्यंतच्या मेट्रो रेल्वे मार्गाचे गुरुवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी उद्घाटन केले.
येथील यलचेनहळ्ळीपासून अंजनापूरपर्यंतच्या मेट्रोच्या उद्घाटनासाठी येडियुराप्पा बेंगळूरच्या कोननकुंटे मेट्रो रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी 6 कि. मी. लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले. त्यांनी मेट्रो रेल्वेला हिरवे निशाण दाखविले. मंत्री आर. अशोक, सुरेशकुमार, सदानंदगौडा, आदी याप्रसंगी उपस्थित होते.
सदर मेट्रो रेल्वे मार्गासाठी 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 6.25 कि. मी. लांबीच्या या मार्गावर कोणनकुंटे क्रॉस, कृष्णलीला पार्क, वाजरहळ्ळी, तलघट्टपूर, अंजनापूर टाऊनशिप अशी पाच एलिवेटेड रेल्वेस्थानके निर्माण करण्यात आली आहेत. 16 जानेवारीपासून या मार्गावरील मेट्रो रेल्वेसेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.