अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेची निराशा
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यांना अधिक अनुदानाची तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात कर्नाटकाला झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा राज्यातील भाजप खासदारांची होती. केवळ बेंगळूरमधील मेट्रो रेल्वे योजनेसाठी अनुदान आणि 278 कि. मी. लांबीची बेंगळूर-चेन्नई एक्स्प्रेस वे योजना घोषित करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात बेंगळूरच्या नम्म मेट्रो रेल्वे योजनेसाठी 14,778 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे 58.19 कि. मी. लांबीचा नवा मेट्रो रेल्वे मार्ग निर्माण करणे शक्य होणार आहे. बेंगळूरमध्ये दुसऱया टप्प्यातील मेट्रो रेल्वे योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेच्या 2 अ आणि 2 बच्या विस्ताराची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
सध्या बेंगळूरमध्ये मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील योजनेतील ग्रीन आणि पर्पल मार्गावर मेट्रो रेल्वे धावत आहेत. या योजनेतील विस्तारालाही यामुळे गती मिळणार आहे. त्याचप्रमाणे 278 कि. मी. लांबीच्यी बेंगळूर-चेन्नई एक्स्प्रेस वेचीही घोषणा करण्यात आली आहे. या महामार्गाचे काम यंदापासूनच हाती घेण्यात येणार आहे.