पालकमंत्र्यांच्या बांधकाम विभागास सर्व्हे करण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळापासून भिजत पडलेला सातारच्या मेडिकल कॉलेजला आता वेग येऊ लागला आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी तातडीने घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह व बांधकाम विभागाला सूचना केल्या. पाटबंधारे विभागाची जागा हस्तांतरण करण्यासाठी कोणकोणत्या इमारती येत आहेत, त्यांचे बांधकाम कसे करावे लागेल, याचा सर्व्हे करण्यात यावा. शासनाकडे 684.94 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीला पाठवला आहे. तो मंजुर होऊन येईपर्यंत इतर कार्यवाही पूर्ण करा, असे त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे बांधकाम विभागानेही लगेच कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जलसंपदा विभागाची जागा हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याने वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न आता सुटला आहे. सातारकरांसाठी वैद्यकीय महाविद्यालय अत्यंत आवश्यक आहे. या नियोजित शासकीय महाविद्यालयाबाबत जागा हस्तांतरण आणि पुढील प्रक्रिया गतीने होण्यासाठी सहकार व पणनमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता निकम, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, तहसीलदार सातारा आशा होळकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मेडिकल कॉलेजच्या कामकाजाचे नेमके काय काय सुरू आहे. त्याचा आढावा घेतला. पाटबंधारे विभागाची कोणती कार्यालये त्या जागेत येत आहेत. ती कार्यालये अन्यत्र हलवून जेवढी अपेक्षित आरखाडय़ावरील जागा आहे. त्या जागेवर बांधकाम करण्याचा सर्व्हे करायला सुरुवात करा. शासनाकडून निविदा काढून त्या कामाचा पायाभरणी लवकर सुरुवात करू. सल्लागार समिती नेमून पाटबंधारे विभागाची जागा हस्तांतरण करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. प्रत्येक विभागाने कामात कुचराई करू नका मला ते चालत नाही, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सुनावले.
कित्येक वर्षाचा प्रश्न लागणार मार्गी
सातारा येथील खावली येथे मेडिकल कॉलेज कधी पूर्ण होईल असे सातारकरांना स्वप्नच वाटत होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिला अन् पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्या शब्दाप्रमाणे पाठपुरावा सुरू केला आहे. पाटबंधारे विभागाच्या जागेच्या हस्तांतरणवर ही मंत्री जयंत पाटील यांनी सह्या केल्या आहेत. त्यामुळे आता उरलेले काम ही मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे वारंवार बैठका घेऊन जिल्हा प्रशासनाला सूचना करत आहेत.