तातडीने साहित्य खरेदीसाठी 15 लाखाची मदत
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी शासनाने मान्यता देऊन तीन वर्षांकरिता क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय हस्तांतर करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. मेडिकल कॉलेज उभारणीसाठी मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून जलसंपदा विभागाची जागा हस्तांतर झाली असून या जागेत 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि 500 खाटांचे रुग्णालय उभारणीसाठी एकूण 495 कोटी 46 लाख एवढय़ा निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद यांच्याकडून महाविद्यालयाची पाहणी होणार आहे. या पाहणीसाठी तातडीने उपकरणांची उपलब्धता करणे आवश्यक असल्याने त्या करिता जिल्हा बँकेने मेडिकल कॉलेजसाठी मदत करण्याचा निर्णय घेऊन रक्कम रु. 15 लाखाचा धनादेश वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड यांच्याकडे देण्यात आला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
याप्रसंगी बँकेचे जेष्ठ संचालक, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुपूर्त केला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, संचालक आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, विक्रमसिंह पाटणकर, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, नितीन पाटील, शिवरूपराजे निंबाळकर, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, संचालिका सुरेखा पाटील तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सातारा जिह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यलय सुरु होत असल्याने जिह्यातील नागरिकांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे जिह्यातील लोकांना उपचारांसाठी पुणे, मुंबई या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्याबरोबरच जिह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची फार मोठी संधी उपलब्ध होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेने मदत केली आहे.
याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. बरोबरच एम.डी आणि एम.एस. या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचीही सोय उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस असून सातारचे वैद्यकीय महाविद्यालय कृष्णानगर सातारा येथील जागेत सुरु झाल्यावर देशातील अग्रगण्य वैद्यकीय संस्थांमध्ये त्याचा समावेश होईल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, साताऱयातील नियोजित 100 विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय आणि 500 खाटांचे रुग्णालय याचा फायदा जिह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकरी सभासदांना होणार आहे. शिक्षणासाठी जिह्यातील शेतकऱयांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी किंवा वैद्यकीय उपचारासाठी परजिह्यात जाण्याची गरज राहणार नाही.
यावेळी संचालक आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्हा बँकेचे सर्वकष कामकाजाची नोंद देशाबाहेरही झालेली आहे. बँकेच्या माध्यमातून आत्तापर्यंत नैसर्गिक आपत्तीवेळी अनेकदा आर्थिक मदत केलेली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेने मेडिकल कॉलेजसाठी 15 लाखाची मदत केलेली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत जिह्यातील शासकीय रुग्णालय तसेच कोव्हीड सेंटरला रु. 3 कोटीचे व्हेंटीलेटर व ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर उपलब्ध करून देऊन सहकारी बँकिंगपुढे चांगला आदर्श निर्माण केलेला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड यांनी मेडिकल कॉलेजसाठी सातारा जिल्हा बँकेने केलेली मदत ही समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवल्याचे सांगितले व बँकेचे आभार मानले.