सावंतवाडीतून प्रारंभ
वार्ताहर / सावंतवाडी:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गात व्हावे, यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी रक्तदान आंदोलन पुकारले होते. ग्रामसभा, पंचायत समिती, नगरपालिका यांचे 130 ठराव, नागरिकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना लिहिलेले 25 हजार पोस्टकार्ड, उपोषणे तसेच मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना आतापर्यंत प्रत्यक्ष भेटून निवेदने देण्यात आली. परंतु शासनाचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे आवश्यक आहे. या मागणीसाठी जिल्हय़ातील युवकांनी रक्तदान आंदोलनाची सुरुवात सावंतवाडीतून केली. सदर आंदोलन जिल्हाभर सुरू राहणार आहे.
युवकांनी मोठय़ा प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे समन्वयक ऍड. श्यामराव सावंत यांनी आंदोलनात सहभाग नोंदवत रक्तदात्यांचे आभार मानले. संघटनेचे अध्यक्ष सूर्याजी यांनी हे आंदोलन जिल्हाभर सुरू ठेवणार असून शासन या आंदोलनाची नोंद घेईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी गौतम माठेकर, रॉक डान्टस, पार्थिल माठेकर, अभी गवस, मेहर पडते, रोहित राऊळ, अर्चित पोकळे, राघू चितारी, अनिकेत पाटणकर, दिग्विजय मुरगूड, आकाश सासोलकर, ओंकार अनगोळकर आदी उपस्थित होते.