शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय, पाचशे रुग्ण खाटांच्या रुग्णालयाला मान्यता
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरा:
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सिंधुदुर्गनगरी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या खर्चाचा 966.08 कोटींचा प्रस्ताव मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे.
तसेच सिंधुदुर्गनगरी येथील शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न जिल्हा रुग्णालयाची श्रेणी वाढवून 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापण्यासही मान्यता देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, ऊर्जामंत्री नितीन राऊत, कृषी मंत्री दादा भुसे, शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते.
अलीकडेच सिंधुदुर्गनगरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. पुढील कार्यवाही गतीने करण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर प्रयत्न करीत होते. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागाच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या खर्चाचा 966.08 कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला. चार वर्षांच्या टप्प्यात या निधीची विभागणी करण्यात आली आहे.
यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी चार वर्षांच्या टप्प्यात 572 कोटी रु., महाविद्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 118.55 कोटी, रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 109.19 कोटी, यंत्र सामग्री उपकरणे यासाठी 120 कोटी, आवर्ती खर्च 31.03 कोटी, बाह्य स्रोत खर्च 15.31 कोटी अशा एकूण 966.08 कोटींच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. लवकरात लवकर हा प्रस्ताव नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली. u