पालकमंत्री अनिल परब यांची माहिती : सिव्हील, महिला रूग्णालय व मनोरूग्णालय मेडिकल कॉलेजच्या ताब्यात जाणार : मेडिकल कॉलेजचे काम पूर्णत्वाला जाईपर्यंतचा निर्णय : वैद्यकीय रिक्त पदांचाही प्रश्न मार्गी लावणार
प्रतिनिधी / रत्नागिरी
मेडिकल कॉलेजची उभारणी होईपर्यंत सध्या महिला रूग्णालय, मनोरूग्णालय सिव्हील हॉस्पीटल मेडिकल कॉलेजच्या ताब्यात दिली जाणार आहे. जेणेकरून याचे प्रत्यक्षात कामकाज सुरू होईल आणि ही परिपूर्ण इमारत लवकरच पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केवळ रत्नागिरीच नव्हे तर सिंधुदुर्गमध्ये मेडिकल कॉलेज होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांमध्ये कोकणात वाढ होईल. रूग्णांना कोल्हापूर, मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. अद्यापही वैद्यकीय कमतरता मोठी असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेवून चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दांडेआडम व कापडगाव येथील जागेची आपण पाहणी केली असून या दोन्ही जागा अभ्यासपूर्ण पध्दतीने निवडण्यात आल्या आहेत. मेडिकल कॉलेजची प्रक्रिया सुरू करण्यात आली असुन 300 बेडचे सिव्हील हॉस्पीटल, 300 बेडचे मनोरूग्णालय व 100 बेडचे महिला रूग्णालय मेडिकल कॉलेजसाठी देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रशासनाने दिली.
.