ओबीसींना २७ टक्के, आर्थिक मागसवर्गीय विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षण लागू होणार
नवी दिल्ली /प्रतिनिधी
मोदी सरकारने देशातील मेडिकल प्रवेशासाठी ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी आणि आर्थिक मागास विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. अखिल भारतीय कोट्यामधून आता मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले जाणार आहे. दोन्ही पदव्या (एमबीबीएस, बीडीएस), पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) आणि डिप्लोमा स्तरावरील मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांना २७ टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षणाचा लाभ मोदी सरकारच्या या निर्णयामुळे मिळणार आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी खासदारांनी पंतप्रधान मोदींशी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी १५०० ओबीसी विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि २५०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात आरक्षणाचा लाभ मिळेल. तर ५५० आर्थिक मागसवर्गीय विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि १००० विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात आरक्षण मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने ही माहिती दिली आहे. ऑल इंडिया कोट्यातून यूजी आणि पीजी मेडिकल/डेंटल कोर्सेससाठी ही योजना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून लागू होणार आहे.