सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचे स्पष्टीकरण, नरेश सावळ यांनी चुकीची विधाने केल्याची टीका
प्रतिनिधी / कुडचडे
सार्वजनिक बांधकामखाते सोपस्कार पूर्ण झाल्याशिवाय कोणताही प्रकल्प जाहीर करत नाही. मेणकुरे, डिचोली येथे साळ नदीवर अंदाजे 46 कोटी खर्चून जो 10 एमएलडी जलशुद्धिकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे त्याचे सर्व सोपस्कार पूर्ण झालेले आहेत, असे सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी सोमवारी सावर्डे येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.
सदर प्रकल्प ज्या सर्व्हे क्रमांक 21/2 या जागेत साकारणार आहे त्याचे 1/14 च्या उताऱयाप्रमाणे 16 मालक आहेत. त्यातील हंसराज सुखाजी परब व इतर 15 जणांनीही संमतीपत्रावर सहय़ा केलेल्या आहेत. हा प्रकल्प डिचोलीतील जनतेसाठी आवश्यक असून जनेतसाठी पाण्याची कायमस्वरूपी सोय करणे हा यामागचा उद्देश आहे. त्यासाठी 1200 घन मीटरचा संप, 1200 घन मीटरचा जलाशय, 800 घन मीटरच्या दोन ग्राऊंड लेव्हल स्टोरेज सुविधा तसेच 150 एमएम व 300 एमएमच्या प्रत्येकी 9 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या व परिसरात पाणी पोहोचविण्यासाठी लागणारी 250 एमएम डायची 40 किलोमीटर लांबीची जलवाहिनी अशा सुविधा तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी 46 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकामखाते करणार आहे, असे पाऊसकर यांनी यावेळी सांगितले.
सरकार जनतेच्या हितासाठी विविध प्रकल्प हाती घेत आहे. पण ज्या प्रकारे डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी चुकीची वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे ते चुकीचे आहे. या प्रकल्पासंदर्भात सावळ यांनी स्वतः गावात जाऊन पाहणी करावी व माहिती गोळा करावी. दुसऱयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मिळेल तशी विधाने त्यांनी करू नयेत. तसेच सावळ हे एक माजी आमदार असल्याने त्यांनी आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने पाहणी करावी, असे पाऊसकर पुढे म्हणाले. डिचोलीतील लोक हे देखील आपलेच लोक असून सावळ यांनी केलेल्या विधानांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी दिशाभूल करून घेऊ नये, असे आवाहन मंत्री पाऊसकर यांनी केले.