गाझियाबाद / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये रविवारी एका मेणबत्ती निर्मितीच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन बंब आणि मदत व बचाव पथकाला पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. स्फोटामागील नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी तपासासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
गाझियाबादमधील मोदीनगर येथे रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अजय शंकर पांडय़े आणि पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी हे घटनास्थळी दाखल झाले होते. अचानक झालेल्या या स्फोटामुळे आसपासच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या स्फोटाचा आवाज खूप दूरपर्यंत गेला होता. स्फोटानंतर संपूर्ण कारखाना परिसरात आग लागल्यामुळे कामगारांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळेच मृतांचा आकडा वाढल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेवेळी नेमके किती कामगार कारखान्यामध्ये होते याची माहिती उपलब्ध न झाल्याने जीवितहानीबाबत संदिग्धता व्यक्त होत होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेप्रती शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी जिल्हय़ाधिकाऱयांशी संपर्क साधून घटनेचा आढावा घेतला.