वृत्तसंस्था/ मियामी
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनियल मेदवेदेव्हला पोलंडच्या हुरकेझकडून पराभव पत्करावा लागल्याने सर्बियाच्या जोकोविचने पुरुष टेनिसपटूंच्या मानांकन यादीत पुन्हा अग्रस्थान मिळविले.
अग्रस्थानासाठी गेल्या काही दिवसांपासून जोकोविच आणि मेदवेदेव्ह यांच्यात चुरस निर्माण झाली होती. मध्यंतरी मेदवेदेव्हने जोकोविचला अग्रस्थानावरून खाली खेचत टॉप सिडींग पटकाविले होते. पण मियामी टेनिस स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात पोलंडच्या हुरकेझने मेदवेदेव्हचा 7-6 (9-7), 6-3 असा पराभव केला. या पराभवामुळे मेदवेदेव्हला आपले मानांकनातील अग्रस्थान राखता आले नाही. गेल्या आठवडय़ात इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत मेदवेदेव्हला तिसऱया फेरीत फ्रान्सच्या मोनफिल्सने पराभूत केले होते. पोलंडच्या हुरकेझने मेदवेदेव्हचा पराभव करत मियामी स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. हुरकेझचा उपांत्य फेरीचा सामना स्पेनच्या कार्लोस अलकॅराझबरोबर होणार आहे. स्पेनच्या अलकॅराझने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या केमॅनोव्हिकचा 6-7 (5-7), 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला.