वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ओपनचा नवा चॅम्पियन डॅनील मेदवेदेव्ह व ग्रीकचा स्टेफानोस सित्सिपस यांनी नोव्हॅक जोकोविचसह वर्षअखेरीस होणाऱया एटीपी फायनल्ससाठी पात्रता मिळविली असल्याचे एटीपीने सोमवारी जाहीर केले.
जोकोविचचा स्वप्नभंग करीत मेदवेदेव्हने रविवारी अमेरिकन ग्रँडस्लॅमचे जेतेपद मिळविले. एटीपी फायनल स्पर्धेत एकेरी व दुहेरीतील अव्वल आठ मानांकित खेळाडूंना व जोडय़ांना प्रवेश दिला जातो. मागील वर्षी लंडनमध्ये झालेल्या या शेवटच्या स्पर्धेत मेदवेदेव्हने जेतेपदही पटकावले होते. आता ही स्पर्धा इटलीतील तुरिन येथे खेळविली जाणार आहे. या स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याचा माझा प्रयत्न असेल, असे मेदवेदेव्ह म्हणाला.
जोकोविचने यापूर्वी फायनल स्पर्धा पाच वेळा जिंकली असून यावेळी विम्बल्डन स्पर्धा जिंकून या स्पर्धेसाठी पात्रता मिळविणारा तो पहिला खेळाडू बनला होता. जागतिक द्वितीय मानांकित सित्सिपसने देखील फायनल स्पर्धा 2019 मध्ये जिंकली आहे. त्याने या वर्षात सर्वाधिक 50 सामने जिंकले आहेत. जर्मनीचा व्हेरेव्ह, रशियाचा रुबलेव्ह, इटलीचा बेरेटिनी हे देखील फायनलसाठी पात्रता मिळविण्याच्या मार्गावर आहेत. 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. दुहेरीमध्ये क्रोएशियाचे निकोला मेक्टिक व मेट पॅव्हिक यांनी पात्रता मिळविली आहे. याशिवाय राजीव राम व जो सॅलिसबरी, पियर हय़ुगुस हर्बर्ट व निकोलस मेहुत यांनीही याआधीच पात्रता मिळविली आहे.