वृत्तसंस्था / सेंट पीटर्सबर्ग
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सेंट पीटर्सबर्ग खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत रशियाचा टॉप सीडेड डॅनील मेदव्हेदेव आणि स्वीसचा स्टॅनिसलास वावरिंका यांनी एकेरीत विजयी सलामी दिली.
बुधवारी या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात टॉप सीडेड मेदव्हेदेवने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केटचा 3-6, 6-3, 6-0 असा पराभव केला. या सामन्यात मेदव्हेदेवने 22 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. सप्टेंबर महिन्यात खेळविण्यात आलेल्या अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत मेदव्हेदेवला उपांत्य फेरीत ऑस्ट्रियाच्या थियेमकडून हार पत्करावी लागली होती. दुसऱया एका सामन्यात ओपेल्काने सेरडेरयुसेकचा 3-6, 7-6 (7-5), 6-2 असा पराभव केला. स्वीसच्या वावरिंकाने डॉनस्कॉयचा 6-1, 3-6, 6-3 असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने ट्रोस्कीवर 6-2, 6-3 तर हम्बर्टने कोटोव्हवर 4-6, 6-2, 6-3 अशी मात करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले.