वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेली चार वर्षे भारताच्या वरिष्ठ महिला फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षिका मेमॉल रॉकी यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. सदर माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे सरचिटणीस कुशल दास यांनी दिली आहे.
2017 साली मेमॉल रॉकी यांची भारतीय महिला वरिष्ठ फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी त्यांच्याकडे साहाय्यक प्रशिक्षकपद सोपविले होते. अलिकडच्या कालावधीत भारतीय महिला फुटबॉल संघाची आंतरराष्ट्रीय सामन्यांतील कामगिरी निश्चितच समाधानकारक झाली होती आणि या संघाला मेमॉल यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले होते. काही वैयक्तिक समस्येमुळे आपल्याला हे पद सोडावे लागत असल्याचे मेमॉल रॉकी यांनी सांगितले. भारतीय फुटबॉल फेडरेशन, भारतीय क्रीडा प्राधीकरण (साई) आणि ओडिशा शासनाचे आपल्याला पूर्ण सहकार्य मिळाल्याबद्दल मेमॉल रॉकी यांनी आभार मानले आहेत. 2019 साली मेमॉल रॉकी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला फुटबॉल संघाने सॅफ महिला फुटबॉल स्पर्धा तसेच त्यानंतर नेपाळमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. मेमॉल रॉकी यांनी भारतीय महिला फुटबॉल संघाला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.