ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला आज सकाळी मेरठमधील दौराला स्टेशनवर भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच ट्रेनमधील प्रवासी सुखरूप बाहेर पडले. या आगीत इंजिनसह ट्रेनचे दोन डबे जळून खाक झाले असून, प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहारनपूरहून दिल्लीला जाणारी पॅसेंजर ट्रेन सकाळी 7.10 वाजता दौराला स्टेशनवर आली. त्याचवेळी ट्रेनच्या खालच्या बाजूला आग लागली. धूर आणि ठिणग्या दिसताच प्रवाशीही आरडाओरडा करत ट्रेनमधून बाहेर पडले. प्रवाशांनी ट्रेनमधील सर्व प्रवाशांना सावध केले. बघता-बघता ट्रेनमध्ये लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. रेल्वे प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी पोहोचेपर्यंत इंजिनसह दोन डबे जळून खाक झाले. दरम्यान, काही प्रवाशांच्या मदतीने ट्रेनचे हे डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.