एकाच पक्षाचे उमेदवार आमनेसामने
प्रतिनिधी / पणजी
निश्टावंतांचा अपमान आणि उपऱयांचे लांगूलचालन करण्याच्या धोरणामुळे भाजपमध्ये निर्माण झालेली धुसफूस पालिका राजकारणातून आता पंचायत पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यातूनच पंचायत पोटनिवडणुकीतसुद्धा भाजप विरुद्ध भाजप असे अर्ज दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील 20 पंचायतींच्या 22 प्रभागांसाठी दि. 20 रोजी निवडणूक होणार असून त्याची उमेदवारी दाखल प्रक्रियाही पालिकांच्या बरोबरीनेच घेण्यात आली होती. त्यातून काल शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 74 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 18 पंचायतींसाठी प्रत्येकी एक प्रभाग तर उर्वरित दोन पंचायतींच्या प्रत्येकी दोन प्रभागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
तिसवाडी तालुक्यातील मेरशी आणि आगशी पंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. त्यातील मेरशीच्या दोन प्रभागांसाठी तब्बल 14 तर आगशीसाठी 3 अर्ज दाखल झाले आहेत. तसे पाहता राजकीय दृष्टय़ा मेरशी पंचायतीला खूप महत्व आहे. या पंचायत परिसरात भाजपचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते तथा पदाधिकारीही आहेत. अशावेळी त्यांच्यात एकमत न घडविता एकाच प्रभागातून एकाच पक्षाचे उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यात हेमांगी गोलतकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गोलतकर या माजी पंचसदस्य आहेत. तसेच भाजप मंडळातही त्यांचा समावेश आहे. तरीही आता पोटनिवडणुकीसाठी अन्य एका कार्यकर्त्यानेही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता गोलतकर यांनी बंडखोरी करत स्वतःही उमेदवारी दाखल केली आहे.
त्यासंबंधी विचारले असता विरोधात कुणीही असले तरी आपल्या गत कारकिर्दीत केलेल्या विकासकामांची जाणीव मतदारांना आहे. त्यामुळे आपला विजय नक्की असल्याचा दावा गोलतकर यांनी केला.