संग्राम काटकर / कोल्हापूर
‘मेरा भारत है महान…’ ‘देश मेरा है मेरी जान…’ असे देशभक्तीपर गीत चित्रफितीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या रविराज अरुण पोवार या 37 वर्षीय युवकाने तयार केले आहे. त्याच्याकडून हे गीत प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 7 वाजता ‘रविराज पोवार’ या यु-टय़ुब चॅनेलवर व्हायरल केले जाणार आहे. त्यामुळे हे गीत पहायला आणि ऐकायला आता काहीच तासांचा अवधी बाकी आहे. कृषी महाविद्यालयाच्या परिसरात चित्रित केलेले हे गीत रविराजने देशाच्या सैन्यदलाला समर्पित केले आहे.
रविराजला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे तो शाळेत फारसा रमला नाही. दहावीतही नापास झाल्याने त्याने शाळाच सोडून संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली. ड्रम वादक वडिल अरुण पोवार यांच्याकडून त्याने संगीताचे धडे घेतले. पुढे त्याने संगीतातच करिअर करण्याचे ठरवून त्यादृष्टीने पाऊले उचलली. वायल्डर मेमोरिअल चर्चमधील क्वॉयर ग्रुपमध्ये धार्मिक गाणी गात असतानाच धार्मिक गीते लिहिण्याची आवड निर्माण झाली. धार्मिक गीते लिहित लिहित त्याने चित्रपट गीतेही लिहिण्यास सुरुवात केली. ‘बंपर लॉटरी’, ‘दहावी’, ‘जल्लोष’, ‘तू बोल्ड मी कोल्ड’ या मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी चर्चेचा विषय बनली. मधुर वाटावी अशी गाणी लिहिण्यात रविराजचा हातखंडा दिसून आल्याने राजकीय पक्षांनीही त्याच्याकडून पक्षाची थिमसाँगही तयार करवून घेतले. रविराजकडे चांगल्या पद्धतीच्या जाहिराती, जिंगल्सही तयार करण्याचा उपजत गुणही आहे. त्याची माहिती विविध संस्थांपर्यंत पोहोचली. त्यामुळे संस्थांनीही त्याच्याकडून लक्षवेधी जाहिराती करवून घेतल्याने त्याच्या खिशात चार पैसे पडू लागले.
गेल्या काही वर्षांत शत्रू राष्ट्रांपासून होत राहिलेल्या हल्ल्याच्या रागातून रविराजने देशप्रेमावर आधारीत गीत लिहून ते देशवासियांसह सैन्यदलाला समर्पित करण्याचे ठरवले. त्यानुसार ‘मेरा भारत है महान’ हे गीत त्याने लिहिले. या गिताच्या पहिल्या कडव्यात देशाला आनंद, शांती लाभू दे…अशी प्रार्थना केली आहे, तर दुसऱ्या कवड्य़ातून देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात सैनिक व त्यांच्या त्यागाकडे लक्ष वेधले आहे. या गिताची कृषी महाविद्यालयाच्या आवारात चित्रफिती तयार केली आहे. शिवाय गिताला रविराजसह कोल्हापूरचे गायक पार्थ कोठावळे, वैष्णवी शानबाग व मिरजेचा रजत लोंढे यांनी आपला आवाज दिला आहे. तसेच प्रविण ऐवाळे व मिरजेचा जॉय कांबळे यांनी गीताचे संगीत संयोजन केले आहे. हे गीत 4 मिनीट 56 सेकंद इतक्या कालावधीचे आहे. असे हे गीत प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला यु-टय़ुब चॅनेलद्वारे देशवासियांना पहायला मिळणार आहे. गीत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जावे यासाठी गिताचा टिझरही तयार केला आहे. तो सोमवारी सायंकाळीच सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. टिझरसोबत गिताची लिंकही दिली असून त्याद्वारेही भारतवासियांना देशप्रेमाचे अनुभूती घेता येणार आहे.