वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे सोमवारी घोषित करण्यात आलेल्या ऍथलिट्स आयोगामध्ये एम. सी. मेरी कोम, पी. व्ही. सिंधू, मिराबाई चानू आणि शिवा केशवन यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या ऍथलिट्स आयोगामध्ये दहा प्रमुख क्रीडापटूंचा समावेश आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे ऍथलिट्स आयोगाची नियुक्ती करण्यात आली असून एकूण दहा सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये पाचवेळा विश्व चॅम्पियन महिला मुष्टियोद्धी एम. सी. मेरी कोम, दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तसेच अनेकवेळा हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारा शिवा केशवन आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील महिला वेटलिफ्टर रौप्यपदक विजेती मिराबाई चानूची बिनविरोध निवड झाली आहे. या आयोगामध्ये 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग, वयस्कर अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल, महिला हॉकीपटू राणी रामपाल, महिला समशेरबाज भवानी देवी, नौकानयनपटू बजरंग लाल, भारताचा माजी गोळाफेकधारक ऍथलिट ओ. पी. कराना यांचा या आयोगामध्ये समावेश आहे.
ऍथलिट्स आयोगामध्ये निवडण्यात आलेल्या सर्व म्हणजे दहा सदस्यांपैकी पाच ऑलिम्पियन महिलांचा समावेश आहे. अखिल भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे ऍथलिट्स आयोगासाठी इच्छुक दहा सदस्यांकडून अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, या सदस्यांच्या निवडीसाठी उमेश सिन्हा हे निवडणूक अधिकारी होते. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले सर्व म्हणजे दहा सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा उमेश सिन्हा यांनी केली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या 12 सदस्यांच्या ऍथलिट्स आयोगामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक नेमबाज अभिनव बिंद्रा आणि भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग यांचा समावेश राहील.
2018 साली अभिनव बिंद्रा यांची आयओसीच्या ऍथलिट्स आयोग सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची निवड आठ वर्षांच्या कालावधीसाठी आहे. भारताचे माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग यांची 2019 साली ओसीए ऍथलिट्स आयोग समितीपदी चार वर्षांच्या कालावधीकरीता निवड करण्यात आली होती. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आता नव्या घटनेनुसार या आयोगामध्ये पुरुष आणि महिला यांची संख्या समान ठेवण्यात आली आहे. भारताचे शिवा केशवन यांनी आतापर्यंत सहावेळा हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता दहा सदस्यांच्या ऍथलिट आयोगाला दर्जेदार कामगिरी करणाऱया आठ क्रीडापटूंची निवड करण्याचा अधिकार या नव्या घटनेने उपलब्ध करून दिला आहे.