नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आघाडीची मुष्टियोद्धा एमसी मेरी कोमला पद्मभूषण या देशातील दुसऱया सर्वोच्च नागरी पुरस्काराने व वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मेरी कोम, सिंधू यांच्यासह आठ क्रीडापटूंचा सन्मान केला जाणार असल्याची घोषणा शनिवारी केली गेली. 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पुरस्कारांची घोषणा केली.
क्रिकेटपटू झहीर खान, भारतीय महिला हॉकी संघाची विद्यमान कर्णधार राणी रामपाल, माजी पुरुष हॉकी कर्णधार एम. पी. गणेश, आघाडीचा नेमबाज जितू राय, माजी महिला फुटबॉल कर्णधार ओयनम बेम्बेम देवी, तिरंदाज तरुणदीप राय या अन्य 6 क्रीडापटूंचा 118 पद्मश्री पुरस्कार जेत्यांमध्ये समावेश आहे.
राज्यभेचीही सदस्य असणारी 36 वर्षीय मेरी कोम 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यजेती असून आजवर सहावेळा तिने वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. मूळ मणिपूरच्या मेरीला यापूर्वी 2013 मध्ये पद्मभूषण तर 2006 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केली जाणारी ती केवळ चौथी क्रीडापटू देखील ठरली आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, गिर्यारोहक एडमंड हिलरी व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना 2008 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले गेले होते. यापैकी सचिन तेंडुलकरला 2014 मध्ये भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले गेले आहे.
24 वर्षीय पीव्ही सिंधूचा 16 पद्मभूषण पुरस्कार जेत्यांमध्ये समावेश असून 2016 रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिने ऐतिहासिक रौप्य जिंकले होते. बॅडमिंटनमध्ये ती भारताची आजवरची एकमेव वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. सिंधूने याशिवाय, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 4 पदके (2 रौप्य, 2 कांस्य) जिंकले असून गतवर्षी तने सुवर्णपदकाची कमाई केली. 2015 मध्ये सिंधूला पद्मश्री किताबाने सन्मानित केले गेले होते.
41 वर्षीय झहीर खान हा देशातील सर्वोत्कृष्ट जलद गोलंदाजांपैकी एक असून पारंपरिक कसोटी क्रिकेट प्रकारात कपिलदेवनंतर त्याच्या खात्यावरच अधिक बळी नोंद आहेत. 2011 विश्वचषक जेत्या संघाचाही तो सदस्य राहिला आहे. 25 वर्षीय राणी रामपालने भारतीय संघातर्फे 200 पेक्षा अधिक सामने खेळले असून अलीकडेच अमेरिकेला नमवून टोकियो ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करुन देण्यात तिने सिंहाचा वाटा उचलला होता.