आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप – साक्षी, सिमरनजित, लवलिना, मोनिका, जस्मिन, सवीती, यांना कांस्य
मेरी कोम (51 किलो गट) व साक्षी चौधरी (54 किलो) यांच्यासह चार भारतीय बॉक्सर्सनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपापल्या गटातून अंतिम फेरी गाठत किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. मात्र साक्षीच्या लढतीचे रिव्हय़ू पाहिल्यानंतर तिच्या प्रतिस्पर्धीला विजयी घोषित केल्याने साक्षीला अंतिम फेरीपासून मुकावे लागले आणि केवळ कांस्यपदकावरच समाधान मानावे लागणार आहे. पूजा रानीला 75 किलो गटातून पुढे चाल मिळाल्याने तिला अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे.
सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोमने 51 किलो वजन गटाच्या उपांत्य लढतीत मंगोलियाच्या लुत्सैखान अल्तानत्सेत्सेगवर 4-1 अशी मात करून अंतिम फेरी गाठली. महिलांच्या 64 किलो वजन गटाच्या उपांत्य लढतीत भारताच्या लालबुआतसैहीने कुवैतच्या नूरा अल्मुतैरीवर इतके वर्चस्व राखले होते की, दुसऱया फेरीतच नूराने सामना बहाल केला. नागालँडच्या लालबुआतसैहीची जेतेपदाची लढत कझाकच्या मिलाना सॅफ्रोनोव्हाविरुद्ध होणार आहे. महिलांच्या 75 किलो वजन गटाच्या उपांत्य फेरीत विद्यमान विजेत्या पूजा रानीला पुढे चाल मिळाल्याने अंतिम फेरीत स्थान मिळाले. तिची मंगोलियन प्रतिस्पर्धी मुन्खबात मॅगमारजारगलने या लढतीतून माघार घेतल्याने तिला पुढे चाल मिळाली. पण मुन्खबातने माघारीचे कारण दिले नाही. ‘लढतीच्या दोन तास आधी आम्हाला तिने माघार घेतल्याचे समजले. मात्र माघारीचे कारण आम्हाला सांगण्यात आले नाही,’ असे भारतीय महिला पथकाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर राफाएल बर्गामास्को यांनी सांगितले. अनुपमानेही 81 किलोवरील गटात अंतिम फेरी गाठली आहे. तिने उझ्बेकच्या मोखिरा अब्दुल्लाएव्हावर विजय मिळविला.
रिव्हय़ूनंतर साक्षी पराभूत झाल्याची घोषणा
साक्षीने कझाकच्या अग्रमानांकित दिना झोलामनवर 3-2 अशी निसटती मात केली होती. पण नंतर झोलामनने या निकालाला आव्हान दिल्यावर लढतीचे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्यात झोलामनला विजयी घोषित करण्यात आले. कझाक संघाला तिसऱया फेरीतील निकालाबाबत शंका होती. त्यात झोलामनऐवजी साक्षीला गुण दिला असल्याची त्यांची तक्रार होती. लढतीचा रिव्हय़ू पाहिल्यानंतर आशियाई बॉक्सिंग फेडरेशनने आधीचा निर्णय फिरवून झोलामन विजयी झाल्याची घोषणा केली, असे भारतीय पथकातील एका सूत्राने सांगितले.
पाच जणींना कांस्यपदक
मात्र ऑलिम्पिकपात्र लवलिना बोर्गोहेन (69 किलो) व सिमरनजित कौर (60 किलो) यांच्यासह मोनिका (48 किलो) व पदार्पण करणारी जस्मिन (57 किलो) यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय सवीतीलाही (81 किलो गट) कझाकच्या फरिझा शोलतायकडून पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदक मिळाले. मोनिकाला कझाकच्या द्वितीय मानांकित अलुआ बाल्कीबेकोव्हाने 5-0 असे एकतर्फी नमविले तर जस्मिनलाही आणखी एक कझाकची खेळाडू व्लाडिस्लावा कुख्ताकडून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. सिमरनजितलाही कझाकच्याच प्रतिस्पर्धीकडून हार पत्करावी लागली तर लवलिनाला उझ्बेकच्या नवाबाखोर खमिदोव्हाकडून पराभूत व्हावे लागले. अग्रमानांकति मेरी कोमने मात्र अनुभव पणाला लावत अल्तानत्सेत्सेगवर संघर्षपूर्ण मात केली. ती आता या स्पर्धेत सहावे सुवर्ण मिळविण्याच्या मार्गावर असून जेतेपदासाठी तिला कझाकच्या नझीम कीझायबेचा अडथळा पार करावा लागणार आहे. नझीम कीझायबे ही दोनवेळची वर्ल्ड चॅम्पियन आहे.
बुधवारी रात्री उशिरा झालेल्या पुरुष विभागातील लढतीत आशिष कुमार (75 किलो गट), नरेंदर (91 किलोवरील गट) यांना उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. भारताने या स्पर्धेत 15 पदके निश्चित करून अपूर्व यश मिळविले आहे.