6 मे रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमधील अभिनयामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणार दिव्येंदु शर्मा लवकरच ‘मेरे देश की धरती’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोना संकटामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन वारंवार लांबणीवर टाकले जात होते. परंतु आता याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
दिव्येंदु शर्माचा हा चित्रपट ऍग्रिकल्चरल कॉमेडी धाटणीचा आहे. यात दिव्येंदु शेती करून लोकांची करमणूक करताना दिसून येईल. चित्रपटाचे दिग्दर्शन फराज हैदरने केले आहे. तर याची पटकथा नील चक्रवर्ती यांनी लिहिली आहे. तर संवादलेखन पीयूष मिश्रा यांनी केले आहे. ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट 6 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.
हा चित्रपट ग्रामीण आणि शहरी जीवनामधील भेदभाव यासारख्या सामाजिक मुद्दय़ावर आधारित आहे. चित्रपटात दिव्येंदु शर्मा याच्यासोबत अनंत विधात शर्मा आणि अनुप्रिया गोयंका मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. दिव्येंदु याचबरोबर ‘द रेल्वे मॅन’ या वेबसीरिजमध्ये काम करत आहे. तर दिग्दर्शक इम्तियाज अली याच्यासोबत एका चित्रपटात काम करत आहे.