3.20 लाख लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला : जगात 5 लाख 14 हजार 622 बळी
जगभरात कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत 1 कोटी 06 लाख 14 हजार 490 जणांना लागण झाली आहे. यातील 58 लाख 23 हजार 371 बाधितांना महामारीच्या संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. तर 5 लाख 14 हजार 622 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. वाढता संसर्ग पाहता ऑस्ट्रेलियातील दुसऱया क्रमांकाचे शहर असलेल्या मेलबर्नमध्ये पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. तेथील 3.20 लाख लोकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून टाळेबंदी लागू होणार आहे. मेलबर्नमध्ये 4 आठवडय़ांसाठी निर्बंध लागू करण्यात आले असून सर्व विमानोड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागणार आहे.
चुकीची माहिती पसरवू नका
संयुक्त राष्ट्रसंघाने बुधवारी ‘पॉज’ या नावाने नव्या मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेद्वारे लोकांना समाजमाध्यमांवर कोरोनासंबंधी भ्रामक आणि चुकीची माहिती न पसरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजमाध्यम दिनी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रवक्ते स्टीफन डुजारिक यांनी सांगितले
आहे.
चीनकरता संताप वाढत जाणार
कोरोना फैलाव होत राहिल्यास चीनबद्दलचा माझा संताप वाढत जाणार आहे. महामारी पूर्ण जगात फैलावल्याचे आम्ही सर्वजण पाहत आहोत. अमेरिकेलाही मोठे नुकसान झाले आहे. कोरोना संकट निर्माण करणाऱया चीनबद्दल मी संतप्त आहे. लोक हा संताप अनुभवू शकतात असे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले
आहेत.
बिडेन : प्रचारसभा नाहीच
अमेरिकेत अध्यक्षीय पदाचे डेमोक्रेटिक उमेदवार ज्यो बिडेन यांनी महामारीमुळे आता कुठलीच प्रचारसभा करणार नसल्याची घोषणा केली आहे. डेलावेयर प्रांतात आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. कोरोनासंबंधी डॉक्टरांच्या आदेशाचे पालन करणार आहे. हा निर्णय माझ्यासह देशासाठीही चांगला ठरणार आहे. निवडणूक प्रचारासाठी आता कुठलीच सभा घेणार नसल्याचे बिडेन म्हणाले.
चीन : 3 नवे कोरोनारुग्ण
चीनमध्ये दिवसभरात कोरोना विषाणूचे 3 नवे बाधित सापडले आहेत. देशातील बाधितांचे प्रमाण आता 83,534 झाले आहे. तिन्ही नवे रुग्ण बीजिंग शहरामधील असल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. कोरोना संसर्गामुळे दिवसभरात एकाचाही मृत्यू झालेला नाही. देशात आतापर्यंत 78,479 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली असून 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.
युरोपीय महासंघाची सीमा खुली
युरोपीय महासंघ 1 जुलैपासून ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, रवांडा, सर्बिया, थायलंड, टय़ुनिशिया, न्यूझीलंड, मोरक्को, मॉन्टेग्रो आणि दक्षिण कोरियासाठी स्वतःची सीमा खुली करणार आहे. या देशांचे प्रवासी युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांमध्ये जाऊ शकणार आहेत.
दरदिनी 1 लाख रुग्ण?
अमेरिकेच्या काही प्रांतांमध्ये पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. लोकांनी निष्काळजीपणा सुरूच ठेवल्यास लवकरच अमेरिकेत प्रतिदिन 1 लाख नवे रुग्ण सापडू लागणार असल्याचे विधान जागतिक आरोग्यतज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी केले आहे. सध्या प्रतिदिन 40 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. महामारी अद्याप संपलेली नाही. वाढती रुग्णसंख्या पाहता कॅलिफोर्निया, टेक्सास यासारख्या 16 प्रांतांना पुन्हा खुले करण्याची योजना रद्द करण्यात आली आहे.
मॉस्को : 3,831 बळी
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मागील 24 तासांत कोरोना संसर्गाने 35 जणांचा बळी घेतला आहे. शहरात आतापर्यंत 3,831 जणांना महामारीमुळे जीव गमवावा लागला आहे. दिवसभरात मॉस्कोमध्ये 745 नवे बाधित सापडल्याची माहिती कोरोना व्हायरस रिस्पॉन्स सेंटरने दिली आहे. एक आठवडय़ात नव्या रुग्णांच्या संख्येत 31 टक्क्यांची घट झाली आहे. एक दिवसापूर्वी मॉस्कोमध्ये 35 बळी गेले होते.
4 लसींचे क्लीनिकल ट्रायल
अमेरिकेने कोरोना विषाणूवरील लस तयार करू पाहणाऱया 4 पथकांच्या लसीच्या क्लीनिकल ट्रायलला मंजुरी दिली आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख स्टीफन हान यांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे. 6 अन्य पथकेही लसीच्या क्लीनिकल ट्रायलची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. त्यांच्या कामाचा आढावा घेतल्यावरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.