सर्बियात निर्बंधांच्या विरोधात निदर्शने : जगभरात 1 कोटी 19 लाख 80 हजार 389 बाधित
जगात कोरोना विषाणूची आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 80 हजार 389 जणांना लागण झाली आहे. यातील 69 लाख 24 हजार 452 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. तर 5 लाख 47 हजार 321 बाधित दगावले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात 6 आठवडय़ांसाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. बुधवारी रात्रीपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संसर्गाविरोधात आम्हा सर्वांना एकत्रिपणे लढावे लागणार आहे. या संकटातून बाहेर पडू आणि पूर्ण देशाला वाचवू असा विश्वास असल्याचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे.
सर्बियात टाळेबंदी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या विरोधात सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये लोकांनी संसदेसमोर बुधवारी निदर्शने केली आहेत. निदर्शकांना हटविण्यासाठी पोलिसांना अश्रूधूराचा वापर करावा लागला आहे. सर्बियात मागील आठवडय़ात रुग्ण वाढल्याने अध्यक्ष एलेक्झेंडर वुकिक यांनी मंगळवारी टाळेबंदी लागू करण्याचा आदेश दिला होता.
न्युझीलंड : खासदाराचा राजीनामा
कोरोना रुग्णांची माहिती उघड करणारे न्यूझीलंडचे खासदार हॅमिश वॉकर यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. वॉकर हे नॅशनल पार्टीचे सदस्य आहेत. काही दिवसांपूर्वी वॉकर यांनी काही कोरोनाबाधितांची वैयक्तिक माहिती उघड केली होती. स्वतःच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त करतो, भविष्यात अशी टिप्पणी करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ओमानमध्ये रुग्ण वाढले
ओमानमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण 50 हजारांपेक्षा अधिक झाले आहे. देशात दिवसभरात 1,210 नवे रुग्ण सापडले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ओमानमधील एकूण कोरोनाबळींचा आकडा 233 वर पोहोचला आहे. 47 लाख लोकसंख्या असलेल्या ओमानमध्ये संसर्गाच्या फैलावाचे विश्लेषण करण्यासाठी रविवारपासून 10 आठवडय़ांचे राष्ट्रव्यापी सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे.
हवेद्वारेही संसर्ग फैलावतो
जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच हवेद्वारेही कोरोना संसर्ग फैलावू शकतो असे मान्य केले आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ञ बेनेडेटा एलेग्रांजी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल कोरोना संसर्ग हवेतून फैलावण्याचे काही पुरावे समोर आल्याचे मान्य केले आहे. संसर्ग फैलावण्याचे मार्ग आणि त्याच्या प्रभावाच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी जाणून घेणे आता गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
उज्बेकिस्तानात पुन्हा निर्बंध
मध्य आशियाई देश असलेल्या उज्बेकिस्तानात 10 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत दुसऱया टप्प्यातील टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. सरकारने प्रवासी वाहतुकीवर बंदी घातली आहे. शॉपिंग मॉल, बाजार, उद्याने, कॅफे, रेस्टॉरंट आणि मनोरंजनाच्या ठिकाणांना बंद करण्याचा आदेश दिला आहे. उज्बेकिस्तानात आतापर्यंत 10,838 रुग्ण सापडले असून 41 बळी गेले आहेत.
..तर डब्ल्यूएचओत सामील होऊ
अमेरिकेने मंगळवारी अधिकृतपणे स्वतःला जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळे केले आहे. परंतु अध्यक्षीय पदाचे डेमोक्रेट उमेदवार ज्यो बिडेन यांनी या निर्णयाला चुकीचे ठरविले आहे. जागतिक आरोग्य यंत्रणेला मजबूत करत राहिल्यास अमेरिकेचे नागरिक सुरक्षित राहणार आहेत. अध्यक्ष झाल्यावर पहिल्याच दिवशी अमेरिकेला डब्ल्यूएचओमध्ये सामील करण्याचा निर्णय घेणार आहे. जागतिक स्तरावर अमेरिकेचे नेतृत्व पुन्हा बहाल करणार असल्याचे उद्गार बिडेन यांनी काढले आहेत.
कोलंबिया : ऑगस्टपर्यंत टाळेबंदी
कोलंबियामध्ये 1 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. अध्यक्ष इवान डय़ूक यांनी मंगळवारी देशात सर्वाधिक रुग्ण सापडल्यावर याची घोषणा केली आहे. परंतु 15 जुलैनंतर कमी रुग्ण आढळून आलेल्या शहरांमध्ये निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. काही शहरांदरम्यान विमानसेवा सुरू करण्याचा विचारही सरकार करणार आहे. कोलंबियात आतापर्यंत 1,24,494 बाधित सापडले आहेत. यातील बहुतांश रुग्ण राजधानी बोगोटामध्ये आढळून आले आहेत.
कोरोनायोद्धय़ांचे मानले आभार
दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये ड्रोन्सद्वारे आकाशात रोषणाई करत कोरोनायोद्धय़ांचे आभार मानण्यात आले आहेत. हॅन नदीवर रोषणाईयुक्त ड्रोन्सनी लोकांना संसर्गापासून बचावाचे अनेक संदेशही दिले आहेत. देशाच्या पायाभूत आणि वाहतूक मंत्रालयाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी 900 ग्रॅम वजनाच्या 300 ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता.
ब्रिटन : मिनी बजेट
कोरोनामुळे झालेल्या नुकसानीनंतर अर्थचक्राला वेग देण्यासाठी ब्रिटनमध्ये लघू अर्थसंकल्प (मिनी बजेट) मांडला जाणार आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याची घोषणा केली आहे. शाळा, गृहबांधणी, रस्त्यांची देखभाल, सार्वजनिक वाहतूक आणि वैद्यकीय सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी हा अर्थसंकल्प सहाय्यभूत ठरणार असल्याचे जॉन्सन म्हणाले. अर्थसंकल्पातील निधी कशाप्रकारे खर्च केला जाणार हे अर्थमंत्री ऋषी सुनाक सांगणार आहेत. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 44 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबळी गेले आहेत. युरोपीय देशांमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे.