क्यूबामध्ये गेल्याच्या वृत्ताने खळबळ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँकेत घडलेल्या 13 हजार 500 कोटी रुपयांच्या घोटाळय़ात प्रमुख आरोप असलेला मेहुल चोक्सी हा अँटिग्वा या देशातून पसार झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र, तो सध्या क्यूबा येथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हा घोटाळा केल्यानंतर त्याने 2018 मध्ये भारतातून पलायन केले होते. तो अँटिग्वा या देशात गेल्याचे सांगण्यात आले होते. तेथे तो अनेकदा दिसून आल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. 2019 मध्ये अँटिग्वा सरकारने अधिकृतरित्या तो आपल्या देशात असल्याचे मान्य केले होते. तसेच त्याला योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर भारताकडे सोपविण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. अँटिग्वामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती. तथापि, ती पूर्ण होण्याच्या आतच त्याने तेथून पोबारा केल्याचे आता सांगण्यात आले आहे.
क्यूबा देशाची निवड का ?
चोक्सी याने पळून जाण्यासाठी क्यूबा देशाची निवड केली याचे कारण या देशाशी भारताचा प्रत्यार्पणाचा करार झालेला नाही. त्यामुळे भारतातून पळून गेलेल्या आरोपींसाठी क्यूबा देश सुरक्षित मानला जातो. म्हणून त्याने या देशाची निवड केली असावी, असे सांगण्यात आले आहे. भारताला आता त्याला ताब्यात घेण्यासाठी क्यूबाशी चर्चा करावी लागणार आहे. ही प्रक्रिया प्रदीर्घ काळ चालू शकते. त्याच्या विरोधात इंटरपोलने रेड अलर्ट नोटीस काढली आहे.