प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात एसएसएलसी आणि पियुसी व्दितीय वर्षाच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून परीक्षेची तयारी सुरू आहे. जून 21 ते जुलै 5 या दरम्यान एसएसएलसी परीक्षा होणार आहेत. तर 24 मे ते 16 जून या दरम्यान पियुसी व्दितीय वर्षाची परीक्षा होणार आहे. यंदा 8 लाख 75 हजार 798 विद्यार्थी एसएसएलसीची परीक्षा देणार आहेत. गतवषी ही संख्या 8 लाख 48 हजार 203 होती.
एसएसएलसी व पियुसी व्दितीय वर्षाच्या परीक्षेबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी बेळगाव, धारवाड, हावेरी, गदग, उत्तर कन्नडा, शिरसी या शैक्षणिक जिह्यांची बेळगाव विभागामध्ये बैठक घेतली. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता याबाबत तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
फॉर्म भरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येईल यावर लक्ष द्या, अशी सुचना त्यांनी अधिकाऱयांना केली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर परीक्षा केंद्रांवर सामाजिक अंतर राखणे आवश्यक असून गतवषी 24 विद्यार्थ्यांना एका वर्गात बसविण्यात आले होते. यंदा 18 विद्यार्थ्यांना एका वर्गात बसविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक अंतर राखता येईल या दृष्टिने सर्व तयारी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आणि स्टाफला मास्क आणि सॅनिटायझर देण्यात येणार आहे. तसेच वर्गामध्ये असलेल्या पर्यवेक्षकांना ग्लोव्हज देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव विभागात धारवाड, बेळगाव, चिकोडी, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, शिरसी, विजयपूर, बागलकोट हे शैक्षणिक जिल्ह्ये येतात. यंदा 2 लाख 42 हजार 70 विद्यार्थ्यांनी एसएसएलसी परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे. एकूण 787 केंद्रांवर ही परीक्षा होईल.
यंदा ऑफलाईन वर्गामुळे सिलॅबसमध्ये 70 टक्के कपात करण्यात आली आहे. तथापि, जो सिलॅबस ठरविला आहे त्यापैकी 85 टक्के अभ्यास पूर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांना ताण येवू नये अशा पध्दतीनेच अभ्यास ठरविला गेला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.