सर्वोच्च न्यायालयात सरकारने दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय सैन्य, नौदल आणि वायुदलात महिलांना प्रतिष्ठित एनडीएद्वारे प्रवेश देण्यास सुरुवात केली जाणार आहे. याकरता मे 2022 ची कालमर्यादा पूर्ण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने तयारी सुरू केली असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. एनडीएमध्ये सध्या केवळ पुरुषांनाच प्रवेश मिळतो.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यापूर्वी न्यायालयाने एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये महिलांना कधीपासून प्रवेश मिळविता येईल याची कालमर्यादा प्रतिज्ञापत्राद्वारे सांगण्याचा निर्देश सरकारला दिला होता. एका जनहित याचिकेद्वारे महिलांना एनडीएमध्ये प्रवेश मिळावा अशी मागणी करण्यात आली होती.
एनडीएमध्ये बारावी उत्तीर्ण झाल्यावर कठोर परीक्षेत यशस्वी होणाऱयांनाच प्रवेश दिला जातो. येथील कॅडेटला संरक्षण दलातील अधिकारी दर्जासाठी प्रशिक्षण दिले जाते. महिलांना प्रशिक्षण आणि वास्तव्याची सुविधा उपलब्ध करण्यासाठी तयारी केली जात आहे. एनडीएमध्ये महिलांना कशाप्रकारे प्रशिक्षण द्यावे आणि त्यांचा अभ्यासक्रम कुठला असावा याबाबत तज्ञांचा गट समीक्षा करत असल्याचे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले आहे.