वर्षभरातील बळींपेक्षा मे महिन्यात जास्त मृत्यू : प्रतिदिन सरासरी 48 जण दगावले
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोना महामारीने पहिला बळी घेतल्यापासून गत वर्षभरात दगावलेल्या एकूण रुग्णांमधील निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू हे एका मे महिन्यात झाले आहेत. त्यामुळे कोरोनासाठी मे महिना ’काळा महिना’ ठरला आहे. गत वर्षी जून महिन्यात कोरोनाचा पहिला बळी गेला होता. 31 मे 2021 रोजी ही संख्या 2649 एवढी झाली होती आणि त्यातील 1489 जणांचे बळी मे महिन्यात गेले आहेत. मे महिन्यातील बळींचे हे प्रमाण प्रतिदिन सरासरी 48 एवढे आहे. यावरून मे महिन्याने किती थरार माजवला होता याची कल्पना येते.
मे महिन्यात कोरोनाचा कहर सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. संपूर्ण निम्मा मे महिना रोज दोन ते चार हजारांपेक्षा जास्त बाधित सापडत होते. त्यातील 50 ते 75 जणांचे मृत्यू होत होते. त्यामुळेच महिन्याभरातील मृतांची संख्याही सर्वोच्च पातळीवर पोहोचली. त्यातून 11 महिन्यातील बळींची बरोबरी एका मे महिन्याने केली. या महिन्यात दि. 7 रोजी सर्वाधिक 4195 बाधित सापडले तर दि. 11 रोजी सर्वाधिक 75 जणांचे बळी गेले होते.
दुसऱया बाजूने समाधानकारक बाब म्हणजे रोज सापडणाऱया बाधितांएवढेच किंवा त्यापेक्षा जास्त आणि काही दिवस तर दुप्पट संख्येने रुग्ण कोरोनामुक्तही होत होते. मे महिन्यात एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण बरे होण्याची नोंद दि. 17 रोजी करण्यात आली. त्या दिवशी 4008 जण बरे झाले. त्याचबरोबर या महिन्यात दि. 31 रोजी सर्वात कमी 602 बाधित तसेच सर्वात कमी 24 मृत्यूंचीही नोंद झाली आहे.
मंगळवारी 22 बळी, 903 बाधित
दरम्यान, काल दि. 1 जून रोजी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ तर बळींच्या संख्येत किंचित घट नोंदविण्यात आली. 31 मे रोजी 602 बाधित सापडले होते आणि 24 जणांचे बळी गेले होते. 1 जून रोजी 22 जणांचे बळी गेले आहेत. एकूण 4720 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 903 जण बाधित सापडले. त्यापैकी 93 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले, तर 810 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. 1777 जण कोरोनामुक्त झाले. गेल्या वर्षभरातील एकुण बळींची संख्या 2671 वर पोहोचली आहे. सक्रीय रुग्णसंख्या 11867 झाली आहे. आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 156569 एवढी झाली आहे तर त्यातील 142031 जण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 90.71 टक्के झाले आहे.
दिवसभरातील मृतांपैकी 16 गोमेकॉत, 01 उत्तर जिल्हा इस्पितळात तर 01 दक्षिण जिल्हा इस्पितळात दगावले आहेत. त्याशिवाय उत्तर व दक्षिण गोव्यातील खाजगी इस्पितळात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला तर खोर्ली व शिरोडा आरोग्य केंद्रात प्रत्येकी एका रुग्णास मृत आणण्यात आले होते. या मृतांमध्ये 38 पासून 89 वर्षे वयोगटातील 15 पुरुष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश आहे. या बळींपैकी एका रुग्णाने कोरोनाची पहिली लस घेतली होती, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
मडगावातील रुग्णसंख्याही उतरली तीन अंकांवर
मडगावसह राज्यातील सर्व केंद्रांतील रुग्णसंख्या आता तीन अंकांवर पोहोचली आहे. मडगाव केंद्रात मंगळवारी 923 रुग्ण होते. अन्य केंद्रांपैकी फोंडा येथे 745, पणजीत 585 तर पर्वरीत 548 रुग्ण आहेत. अन्य सर्वत्र त्यापेक्षा कमी रुग्ण आहेत. सर्वात कमी 114 रुग्ण मये केंद्रात आहेत.
केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या
डिचोली 289
सांखळी 379
पेडणे 485
वाळपई 358
म्हापसा 410
पणजी 585
हळदोणा 231
बेतकी 273
कांदोळी 485
कासारवर्णे 129
कोलवाळ 284
खोर्ली 351
चिंबल 482
शिवोली 379
पर्वरी 548
मये 114
कुडचडे 480
काणकोण 245
मडगाव 923
वास्को 354
बाळ्ळी 290
कासावली 445
चिंचिणी 199
कुठ्ठाळी 436
कुडतरी 271
लोटली 361
मडकई 204
केपे 238
सांगे 195
शिरोडा 245
धारबांदोडा 242
फोंडा 745
नावेली 211
प्रवासी 1
———–
01 जून पर्यंतचे एकूण रुग्ण 156569
बरे झालेले रुग्ण 142031
सक्रिय रुग्ण 11867
नवीन रुग्ण 903
बरे झालेले रुग्ण 1777
कोरोना बळी 22
वर्षभरातील एकूण बळी 2671