सातारा तालुक्यातील घटना : सहा युवकांवर गुन्हा
प्रतिनिधी / सातारा
केळवली, ता. सातारा गावच्या हद्दीत मित्रांबरोबर फोटोसेशन व फिरणाऱयास गेलेल्या एका युवतीस तिच्या मित्रांनीच जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर एकाने तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्यावर तिने विरोध केल्यावर तिला मारहाण व शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना घडली. संबंधित युवतीच्या तक्रारीनंतर सहा युवकांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार महाविद्यालयीन युवती दि. 13 रोजी कारमधून केळवली, ता. सातारा गावच्या हद्दीतील डोंगराच्या बाजुला फिरण्यास गेले होते. तिथे फोटोसेशन करत असतानाच या बहाद्दरांनी सोबत दारुही नेली होती. या युवकांपैकी रुद्र (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याने त्या युवतीला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानेही अगोदर ढोसलीच होती मग त्याने युवतीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्यावर युवतीने त्याला विरोध केला. मात्र, रुद्र याने तिच्या अंगाशी झोंबाझोबी करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. युवतीने रुद्रला विरोध केल्याने दारुच्या नशेत असलेल्या रोहन बनसोडे रा. विकासनगर, सातारा, दीपक (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व सोनल धायगुडे रा. लिंब, ता. सातारा या तिघांनी युवतीला कारमध्ये हाताने मारहाण करुन शिवीगाळ केल्याचे तिने तक्रारीत म्हटले असून पोलिसांनी याप्रकरणी रोहन बनसोडे, रुद्र, दीपक, शौर्य, राज व सोनल धायगुडे या सहाजणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक फरांदे या गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहेत.