मित्र-मैत्रिणी हे आपल्या आयुष्याचा एक भाग असतात. मित्रमैत्रिणींसोबत आपण बरंच काही शेअर करत असतो. त्यांच्याकडून सल्लेही घेतो. मात्र मित्रमैत्रिणींचा प्रत्येक सल्ला योग्य असतोच असं नाही. विशेषतः त्यांनी दिलेले आर्थिक सल्ले डोळे झाकून मान्य करू नयेत. तसंच मैत्री असली तरी काही गोष्टी आपल्यापर्यंत ठेवायला हव्यात.
* मित्रमैत्रिणींकडून भावनिक आधार मिळतो. आर्थिक सल्लेही मिळतात. अशा पद्धतीने थेरपिस्टची भूमिका वठवणार्यांना मित्र किंवा मैत्रिणीची नेमकी परिस्थिती माहीत असतेच असं नाही. त्यांच्या समस्येची जाणीव असतेच असं नाही. त्यामुळे कोणताही सल्ला देण्याआधी आपण इतरांच्या समस्यांबद्दल अवगत असायला हवं. नाण्याची एक बाजू पाहून सल्ले देऊ नयेत. तसंच उगाचच सल्ले देत बसण्यापेक्षा मित्र किंवा मैत्रीण आनंदी कशी राहील हे बघायला हवं.
* मित्र-मैत्रिणींकडून सल्ल्याची अपेक्षा करू नका. एक मित्र किंवा मैत्रीण म्हणून सल्ले देण्यासोबतच त्यांचा स्वीकार करतानाही काळजी घ्यायला हवी. बरेचदा मित्रमैत्रिणींकडून गंभीर किंवा आर्थिक मुद्यांबाबत सल्ले घेतले जातात. मात्र आर्थिक सल्ल्याच्या अंधानुकरणामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं.
* प्रत्येक नात्याला मर्यादा असतेच. तशी मर्यादा मैत्रीतही असायला हवी. एकमेकांशी वैयक्तिक आयुष्य फार शेअर करू नका.
यामुळे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. खूप जवळीकही घातक ठरू शकते. त्यामुळे मैत्री घट्ट असली तरी काय शेअर करायचं आणि काय नाही याचं भान असायलाच हवं. मैत्री टिकवण्याच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे.