गोमेकॉत अचानक फुटला सन ग्रेनेड
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात सुरु असलेल्या मॉक ड्रील दरम्यान काल मंगळवारी एटीएसचा एक कमांडो जखमी झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड व गोवा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारपासून आतंकवाद विरोधी मॉक ड्रील सुरु करण्यात आले होते. काल मॉक ड्रीलच्या एका प्रसंगी बांबोळी येथील गोमेकॉच्या एका विभागात सन ग्रेनेडचा स्फोट होऊन जयदेव सावंत एटीएस कमांडो जखमी झाला. सावंत याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला गोमेकॉत भरती करण्यात आले आहे.
मॉक ड्रील दरम्यान बनावट आतंकवाद्यांचा तसेच बनावट बाँबचा वापर केला जातो. बनावट बाँबमध्ये सन ग्रेनेडचा वापर केलो जातो. या बाँबमधून केवळ आवाज होत असतो. गोमेकॉत मॉक ड्रीलमध्ये बनावट बाँब शोधून काढण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. त्याचदरम्यान बाँबचा स्फोट झाला. त्याच्या समोर अचानकपणे झालेल्या स्फोटामुळे जयदेव सावंत खाली पडला. त्याच्या पायाला जखम झाली आहे.
कला अकादमी, विधानसभा, राजभवन, ताज विवांता हॉटेल, शारदामंदिर हायस्कूल व जीएमसी अशा सहा ठिकाणी सोमवार व मंगळवारी मॉक ड्रील करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या मॉकड्रीलमध्ये गोवा पोलीस खात्याच्या 500 पोलिसांचा तर राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या एक हजार गार्डांचा सहभाग होता.