ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरण मोहीम तीव्र करण्यावर भर दिला जात आहे. सध्या देशात कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक-व्ही लस देण्यात येत आहे.आता आणखी एक लस भारतात उपलब्ध होणार आहे. 15 जुलैपर्यंत अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ची लस भारतातील काही रुग्णालयांमध्ये उपलब्ध होऊ शकते, असे सांगण्यात येते.
गेल्या महिन्यातच औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) देशात आपत्कालीन वापरासाठी मॉडर्ना लसीला हिरवा झेंडा दाखवला होता. तसेच सिप्लाला देशात आपत्कालीन वापरासाठी मॉडर्ना लस आयात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे 15 जुलैपर्यंत ही लस भारतातील काही रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
मॉडर्ना लस एमआरएनएवर आधारित आहे. म्हणजेच या लसीमध्ये स्पाईक प्रथिने किंवा विषाणूच्या जनुकीय कोडचे अंश असतात. शरीराला इंजेक्शन देताच ही लस रोगप्रतिकारक शक्तीला कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रतिपिंड तयार करण्याचे आणि टी-सेल सक्रिय करून संक्रमित पेशी नष्ट करण्याचे निर्देश देते.