वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनला (एफडीएफ) सल्लागार मंडळाने मॉडर्नाच्या कोरोना लसीला मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. एफडीएने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही, परंतु अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर मंजुरी मिळाल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर चिनी विषाणूचे सर्वात मोठे शिकार ठरलेल्या देशांना लवकरच लस मिळणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.
एफडीएकडे वॅक्सिन्स अँड रिलेटेड बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स ऍडव्हायजरी कमिटीने 20-0 मतांनी मॉडर्नाची शिफारस केली आहे. एफडीए लवकरच आपत्कालीन वापराची अनुमती देईल आणि पुढील आठवडय़ापासून याचे वितरण सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. देशात यापूर्वीच फायजरची लस देण्याच्s काम सुरू झाले आहे. मंजुरी मिळाल्यावर मॉडर्ना अमेरिकेची दुसरी कंपनी ठरणार आहे.
चिनी विषाणूचे शिकार ठरलेला युरोप आणि जगातील अन्य देश विशेषकरून जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि इटली हे लस मिळविण्याच्या मार्गावर असल्याचे ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे.
94.1 टक्के प्रभावोत्पादक
30 हजार लोकांवरील वैद्यकीय परीक्षणादरम्यान या लसीने 94.1 टक्के प्रभावोत्पादकता दाखविल्याची पुष्टी एफडीएच्या आढाव्यात झाली आहे. परंतु ही लस घेतल्यावर लोकांमध्ये ताप, डोकेदुखी आणि थकवा यासारखे दुष्परिणाम दिसून आले होते. पण वैज्ञानिकांनी याला धोकादायक मानलेले नाही.