अगालेगा बेटावर तळ उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त
@ वृत्तसंस्था / पोर्ट लुईस
मागील काही महिन्यांपासून हिंदी महासागरातील एक बेट भारतच नव्हे तर जगभरातील चर्चेचा विषय ठरले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी अगलेगा बेटाला भारताचा सागरी तळ संबोधिले आहे. पण भारतीय नौदल तसेच सरकारने या दाव्याबद्दल कुठलीच अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
अल जझिरा या जगप्रसिद्ध वाहिनीने भारत अगलेला बेटावर सैन्यतळ निर्माण करत असल्याचे वृत्त दिले आहे. अगलेगामध्ये निर्माणाधीन एका धावपट्टीचा वापर निश्चितपणे भारतीय नौदलाकडून गस्त मोहिमेसाठी केला जाणार असल्याचे अल जझिराने स्वतःच्या अहवालात म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या लोवी इन्स्टीटय़ूटने देखील असाच दावा केला होता.
कुठले आहे अगलेला बेट?
अगलेला हे मॉरिशसच्या मुख्य बेटापासून सुमारे 1,110 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱया दोन बेटांचा समूह आहे. याचे उत्तरेकडील बेट 12.5 किलोमीटर लांबीचे आणि 1.5 किलोमीटर रुंदीचे आहे. तर दक्षिणेकडील बेट 7 किलोमीटर लांबीचे आणि 4.5 किलोमीटर रुंदीचे आहे. याच्या विंग्ट सिंक या उत्तरेकडील बेटावर एक धावपट्टी तयार करण्यात आली आहे. 6400 एकरामध्ये फैलावलेल्या या बेटावर सुमारे 300 लोकांचे वास्तव्य आहे.
भारताचा सागरी तळ
मॉरिशसचे अगलेगा बेट भारत विकसित करत आहे. या बेटावरील धावपट्टीचे काही दिवसांपूर्वीच विस्तारीकरण करण्यात आले आहे. याचबरोबर बेटाच्या किनाऱयांवर नौका तसेच बोट थांबतील अशाप्रकारच्या जेटीची निर्मिती करण्यात आली आहे. याच आधारावर अनेक आंतरराष्ट्रीय थिंक टँक आणि प्रसारमाध्यमे याला भारताचा सैन्यतळ ठरवत आहेत.
2015 मध्ये मॉरिशससोबत करार
मॉरिशसच्या अगलेगा बेटावर सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी 2015मध्ये भारताने करार केला होता. तेव्हापासून या बेटावरील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे. या करारात बेटावर सागरी आणि हवाई संपर्कात सुधारणा करण्यासाठी पायाभूत सुविधांची स्थापना आणि अपग्रेडेशनचे काम सामील आहे. याचबरोबर बेटाच्या परिसरात परस्पर सागरी हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी मॉरिशसच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यावरून देखील करार झाला होता.
सामरिक महत्त्व
मॉरिशस हिंदी महासागरात सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या स्थानावर आहे. याच सागरी भागातून दरवर्षी अब्जावधी डॉलर्सच्या मालाची वाहतूक होत असते. आफ्रिका खंडानजीक असल्याने या देशातून हिंदी महासागराच्या मोठय़ा भागावर नजर ठेवली जाऊ शकते. या देशाकडेच रेयूनियो बेट असून त्यावर फ्रान्सचा कब्जा आहे. फ्रान्सने या बेटावर मोठा सैन्यतळ निर्माण केला आहे. मॉरिशसच्या उत्तर-पूर्व दिशेत डिएगो गार्सिया असून तेथे अमेरिका तसेच ब्रिटनच्या सैन्याचा तळ आहे.
मॉरिशससोबत घनिष्ठ संबंध
भारत आणि मॉरीशस यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ आहेत. भारतासोबत मुक्त व्यापार करार, ब्ल्यू ओशन इकॉनॉमी, सागरी सुरक्षा, चाचेगिरी विरोधातील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये मॉरिशस उभा राहिला आहे. मॉरिशसमध्ये भारताने अनेक प्रकल्प राबविले असून यात मेट्रोसेवा तसेच रुग्णालय उभारणी सामील आहे.