राजस्थान रॉयल्सशी करारबद्ध, आयपीएल इतिहासातील सर्वोच्च बोली, काईल जेमिसनला 15 कोटी, ग्लेन मॅक्सवेल 14.25 कोटींना आरसीबीशी करारबद्ध
वृत्तसंस्था / चेन्नई
दक्षिण आफ्रिकन अष्टपैलू ख्रिस मॉरिस आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. चुरशीच्या लिलावात मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपये इतकी सर्वोच्च बोली लावत त्याला करारबद्ध केले आणि हा आयपीएलमधील नवा विक्रम ठरला. काईल जेमिसनला आरसीबीने 15 कोटी रुपयांना करारबद्ध केले. ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल आणखी एक महागडा खेळाडू ठरला असून आरसीबीने त्याच्यासाठी 14.25 कोटी रुपये मोजले.
या लिलावासाठी सर्वाधिक रक्कम राखून ठेवणे शक्य झालेल्या पंजाब संघाने ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज झाय रिचर्डसनला 14 कोटी रुपयांना करारबद्ध केले. रिचर्डसनला करारबद्ध करताना गोलंदाजीतील त्रुटी दूर करण्याचा पंजाब किंग्सचा प्रयत्न आहे. कर्नाटकाचा केएस गौतम 9.25 कोटी रुपयांचा मानकरी ठरला. त्याला चेन्नईने करारबद्ध केले.
24 वर्षीय रिचर्डसनने ऑस्ट्रेलियन संघातर्फे 2 कसोटी, 13 वनडे व 9 टी-20 सामने खेळले आहेत. अलीकडेच बिग बॅश स्पर्धेत त्यानेच सर्वाधिक बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज नॅथन कुल्टर-नाईलला मुंबई इंडियन्सने 5 कोटी रुपयांना संघात घेतले. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.
75 लाख रुपये इतकी बेस प्राईस असलेल्या मॉरिससाठी 4 संघांमध्ये चुरस रंगली. नंतर राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स या संघांमध्ये अंतिम टप्प्यात आणखी आणखी रस्सीखेच रंगत गेली. अंतिमतः रॉयल्सने त्याला आयपीएल सर्वोच्च किमतीसह करारबद्ध केले. ख्रिस मॉरिसने आतापर्यंत खेळलेल्या 70 सामन्यात 23.95 च्या सरासरीने 551 धावा जमवल्या असून 23.98 च्या सरासरीने 80 बळीही घेतले आहेत.
मॅक्सवेलकरिता आरसीबीला यश
प्रारंभी, ग्लेन मॅक्सवेलसाठी केकेआरने जोरदार आघाडी उघडली. पण, नंतर त्याच्यासाठी चेन्नई सुपरकिंग्स व आरसीबी यांच्यात थेट सामना सुरु झाला. अंतिमतः विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने त्याला करारबद्ध केले. ‘आम्हाला एक्स-फॅक्टर खेळाडू हवा होता. त्यासाठी आम्ही मॅक्सवेलला संघात घेतले’, असे आरसीबीचे क्रिकेट संचालक माईक हेस्सन म्हणाले.
यापूर्वी, मागील हंगामात मॅक्सवेलला पंजाब किंग्सने 10.75 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. मात्र, पंजाबने नंतर त्याला संघातून मुक्त केले. मागील हंगामात मॅक्सवेलने अगदीच निराशा केली. बांगलादेशचा स्टार खेळाडू शकीब हसनला केकेआरने 3.2 कोटी रुपयांना करारबद्ध केले. मागील हंगामात बुकीने संपर्क केल्याची माहिती न दिल्याबद्दल निलंबित असल्याने तो खेळू शकला नव्हता. पीयूष चावलाला मुंबईने 2.4 कोटी रुपयांना संघात घेतले.
लिलावाच्या दुसऱया टप्प्यात करारबद्ध झालेले खेळाडू
डॅनिएल ख्रिस्तियन (4.8 कोटी, आरसीबी), हरभजन सिंग (2 कोटी, केकेआर), केदार जाधव (हैदराबाद, 2 कोटी), सॅम बिलिंग्ज (दिल्ली, 2 कोटी), करुण नायर (केकेआर, 50 लाख), जलज सक्सेना (पंजाब किंग्स, 30 लाख रुपये), उत्कर्ष सिंग (पंजाब किंग्स, 20 लाख), वैभव अरोरा (केकेआर, 20 लाख), फॅबियन ऍलेन (पंजाब, 75 लाख), लियाम लिव्हिंगस्टोन (राजस्थान, 75 लाख), बेन कटिंग (केकेआर, 75 लाख), सुयश प्रभुदेसाई (आरसीबी, 20 लाख), केएस भरत (आरसीबी, 20 लाख), युद्धवीर चरक (मुंबई, 20 लाख), मार्को जेन्सन (मुंबई, 20 लाख), सौरभ कुमार (पंजाब, 20 लाख), कुलदीप यादव ज्युनियर (राजस्थान, 20 लाख), जिमी नीशम (मुंबई, 50 लाख), सौरभ कुमार (पंजाब, 20 लाख), अर्जुन तेंडुलकर (मुंबई, 20 लाख)
मेरेडिथची 40 लाखाची प्राईस….बोली 8 कोटींची!
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू रिली मेरेडिथ याची या लिलावासाठी फक्त 40 लाख रुपये इतकी बेस प्राईस होती. पण, प्रत्यक्ष लिलावात काही दिग्गज खेळाडूंना अगदी खरेदीदारही लाभलेला नसताना रिलीसाठी मात्र प्रँचायझींमध्ये चांगलीच चुरस रंगली आणि अंतिमतः त्याला पंजाब किंग्सने 8 कोटी रुपयांना करारबद्ध केले. पंजाबमध्ये यापूर्वी मॅक्सवेलसारखा अव्वल खेळाडू होता. त्याची जागा भरुन काढण्यासाठी पंजाबने ही सर्वोच्च बोली लावली असल्याचे संकेत आहेत.
अखेर चेतेश्वर पुजाराला प्रँचायझी लाभला!
कसोटी स्पेशालिस्ट हा शिक्का बसलेल्या चेतेश्वर पुजाराकडे आयपीएल लिलावात सातत्याने दुर्लक्षच झाले आहे. प्रत्येक चेंडूवर उत्तूंग फटकेबाजीची आवश्यकता असलेल्या या टी-20 क्रिकेट प्रकारात पुजाराची फलंदाजी शैली बसत नाही, हे त्याचे मुख्य कारण. यंदा या लिलावात मात्र फासे पलटले आहेत आणि चेतेश्वर पुजाराला देखील करारबद्ध केले गेले आहे. पुजारा या हंगामात चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दिसेल. चेन्नईने त्याला 50 लाख रुपये मोजत खरेदी केले.
प्रीती झिंटाच्या संघात ‘शाहरुख खान’!
प्रीती झिंटा सहभागीदार असलेल्या पंजाब किंग्स संघात शाहरुख खान, असे म्हटल्यावर अर्थातच आश्चर्याने भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र, हा शाहरुख खान केकेआरचा संघमालक नव्हे तर नवोदित क्रिकेटपटू शाहरुख खान हा आहे. प्रीतीच्या संघाने केरळच्या या ज्युनियर शाहरुखसाठी 5.25 कोटी रुपये मोजले आहेत. या शाहरुखने अलीकडेच संपन्न झालेल्या सईद मुश्ताक अली स्पर्धेत जोरदार फटकेबाजी केली होती.
मॉरिसला करारबद्ध करण्यापूर्वी रॉयल्सकडून थेट चाचपणी!
ख्रिस मॉरिसला सर्वोच्च रकमेला करारबद्ध करण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सने कशी चाचपणी केली, याची माहिती संघाचे कार्यकारी अधिकारी जेक लॅच मॅक्रम यांनी दिली. ते म्हणाले, ‘ख्रिस मॉरिस पूर्ण तंदुरुस्त आहे का, याची आम्हाला खातरजमा करुन घ्यायची होती. त्यांनी आम्ही लिलावापूर्वी थेट त्याच्याशी संवाद साधला आणि त्याच्या तंदुरुस्तीचा आढावाही घेतला. सध्या तो दक्षिण आफ्रिकेत बायो-बबलमध्ये आहे आणि प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणार आहे’.