प्रतिनिधी/ कराड
संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉक करत फिरणारांना सोमवारी पोलिसांनी पकडले होते. त्यांना मंगळवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना प्रत्येकी 1 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान न्यायलयाच्या आदेशाप्रमाणे 73 जणांनी दंड भरला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संचारबंदी लागू आहे. असे असतानाही कराड शहर, मलकापूर, सैदापूर परिसरात अनेकजण मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक करत फिरत आहेत. त्यांना सोमवारी पोलिसांनी पकडले होते. पकडलेल्या सर्वांना कराड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात त्या सर्वांना मंगळवारी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे 76 जण मंगळवारी न्यायालयात हजर झाले. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायलयाने त्या सर्वांना प्रत्येकी एक हजार रूपये दंड केला. 73 जणांनी हजार रूपये दंड भरला तर तिघांनी पुढील तारीख मागून घेतली. दरम्यान, या कारवाईचा परिणाम मंगळवारी सकाळी पाहावयास मिळाला. सकाळी कोणीही व्यायामासाठी बाहेर पडल्याचे दिसत नव्हते.