वृद्ध महिलेने 7 कोटींमध्येही विकली नाही जमीन
अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एक नवा शॉपिंग मॉल निर्माण करण्यासाठी बिल्डर्स एका महिलेच्या घराची जमीन खरेदी करू इच्छित होते. याकरता त्यांनी वृद्ध महिलेला 1 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 7 कोटी रुपये)ची ऑफरही दिली होती. परंतु महिलेने ती फेटाळल्यावर स्थानिक लोकांसाठी ती ‘नायिका’ ठरली आहे. इतकेच नव्हे तर बिल्डर्सना नाइलाजास्तव महिलेच्या घराभोवतीच मॉल तयार करावा लागला. यामुळे हे घर मॉल परिसरात अत्यंत वेगळे दिसून येते. ही घटना सिएटलमध्ये 2006 साली घडली होती.
हे 108 वर्षे जुने घर अत्यंत महाग नव्हते. परंतु मालमत्ता विकासकाने शॉपिंग मॉलसाठी परिसरातील अन्य घरांची खरेदी केली होती. एडिथ यांना मोठय़ा रकमेची ऑफर त्यांनी दिली होती. परंतु जमीन न सोडण्यावर ठाम राहत एडिथ यांनी बिल्डर्सची कोटय़वधींची ऑफरही नाकारली होती.
मॉलने घेरलेले घर
बिल्डरांना यामुळे त्यांच्या घराला सोडूनच मॉल तयार करावा लागला. यातून महिलेचे घर मॉलच्या पाचमजली परिसरादरम्यान गर्वाने उभे दिसून येते. 84 वर्षीय एडिथ मेसफील्ड यांनी 1952 मध्ये ही जमीन 3,750 डॉलर्समध्ये खरेदी केली होती. 2006 मध्ये मॉलच्या निर्मितीचा कॅस्ट्रक्टर मॅनेजर बेरी मार्टिन होते. त्यांच्याशी एडिथ यांची मैत्री झाली. 2008 मध्ये मृत्यू होण्यापूर्वी एडिथ त्यांनी स्वतःचे घर मार्टिन यांच्या नावावर केले होते. परंतु बेरोजगार झाल्यावर मार्टिन यांनी हे घर विकले.
यासाठी विकू इच्छित नव्हते..
मी विकासाच्या विरोधात असल्याचे अनेक जणांचे मानणे असले तरी हे सत्य नाही. मी पुन्हा नव्या ठिकाणी स्थायिक होण्याच्या प्रक्रियेला सामोरी जाऊ इच्छित नव्हते असे एडिथ यांचे म्हणणे होते. पुढील काळात हे घर डिस्नेचा प्रसिद्ध चित्रपट अपसाठी प्रेरणा ठरले.