नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी भारतीय हॉकीपटू व 1980 मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णजेते रविंदर पाल सिंग यांचे शनिवारी सकाळी लखनौ येथे निधन झाले. मागील दोन आठवडय़ांपासून ते कोरोनाविरुद्ध झुंजत होते. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. निधनसमयी ते 60 वर्षांचे होते.
रविंदर पाल सिंग यांना दि. 24 एप्रिल रोजी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदर यांनी कोरोनावर मात केली व त्यांना नॉन-कोव्हिड वॉर्डात हलवले गेले. पण, शुक्रवारी पुन्हा त्यांची तब्येत अचानक बिघडली. 1984 लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेतही प्रतिनिधीत्व करणारे रविंदर अविवाहित राहिले. त्यांनी 1979 ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धा खेळली आणि हॉकी सोडल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामधूनही स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती.
दि. 6 सप्टेंबर 1960 रोजी सितापूर येथे जन्मलेल्या रविंदर पाल सिंग यांनी 1979 ते 1984 या कालावधीत सेंटर हाफ पोझिशनवर विशेष हुकूमत गाजवली. त्यांनी दोन ऑलिम्पिक स्पर्धांशिवाय, कराची चॅम्पियन्स ट्रॉफी (1980, 1983), हाँगकाँगमधील सिल्व्हर ज्युबिली 10-नेशन कप (1983), मुंबईतील 1982 चा विश्वचषक, तसेच, 1982 कराची आशिया कपमध्येही सहभाग घेतला होता. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी रविंदर पाल सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हॉकी इंडियाने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली.