हल्ल्यातून बालिका सुदैवाने बचावली
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात पाठीमागे कुत्र्यांच्या हल्यात लहान मुलाला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तशीच घटना सदरबझार परिसरात नुकतीच घडली आहे. सदरबझार येथील बालिका कुत्र्यांच्या हल्यातून सुदैवाने बचावल्याचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी होवू लागली आहे.
सातारा येथील सदरबझार परिसरात 7 ते 8 मोकाट फिरणाऱया कुत्र्याच्या टोळक्याने एका लहान मुलीवर हल्ला केला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे. सदरबझार परिसरात असलेल्या कत्तलखान्यामुळे या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त प्रमाणात आहे. अनेक वेळा लहान मुलांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी कल्याणी शाळेसमोर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला होता. मोकाट कुत्र्यांनी मुलीचे भरदिवसा शरीराचे लचके तोडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. अशाच प्रकारचे हल्ले सदरबझारमध्ये होऊ लागल्याने कल्याणी शाळेसमोरील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातारा पालिका प्रशासनाने या प्रकरणात वेळेत लक्ष घालून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.