प्रतिनिधी/ बेळगाव
एकीकडे कोरोनाचे संकट आणि नागरिकांना लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांना भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे. संभाजीनगर, गणेश कॉलनी, दुसरा क्रॉस, वडगाव येथे मोकाट कुत्र्यांनी दोन मुलांवर हल्ला करून त्यांचा चावा घेतला आहे. मंगळवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सदर मुले सहा व नऊ वर्षे वयोगटातील आहेत. यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या कोरोनामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त आहेत. यामुळे अन्य समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळेनासा झाला आहे. मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत जवळ जवळ सगळीकडेच मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या कळपाने येऊन हल्ले करण्याचे प्रकारही वाढले आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी ही कुत्री अंगावर धावून येत आहेत. संभाजी नगर, गणेश कॉलनी येथेही दहा-बारा मोकाट कुत्र्यांचा कळप असून त्यातील दोन कुत्र्यांनी या बालकांवर हल्ला करून चावा घेतला आहे. सदर मुले घरासमोर खेळत होती. कुत्र्यांनी पाठलाग करून मुलांचा चावा घेतला आहे. यामध्ये एका मुलास गंभीर इजा पोहोचली आहे. सदर कुत्री पिसाळलेली असावीत अशी शक्मयता येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य खात्याने तात्काळ येथील भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.