प्रतिनिधी / चंदगड
चंदगड फाटय़ानजिक असलेल्या पोलीस वसाहतीजवळ झालेल्या मोटरसायकल अपघातात लकीकट्टे गावचे दोन तरूण ठार झाले. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्यात पडलेले प्रचंड खड्डे आणि पसरलेले गडद धुके, या रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता मोटरसायकल भरधाव वेगाने चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला.
लकीकट्टे येथून ज्ञानेश्वर मनोहर कांबळे (वय.23) आणि गौतम भगवान कांबळे (वय.22) हे स्प्लेंडर मोटरसायकल (एम.एच.09 इ.व्ही 0561) वरून चंदगडच्या दिशेने चालले होते. चंदगड येथील एका हळदी समारंभात सहभागी होण्यासाठी ते वेगाने चालले होते. रात्री दहाच्या सुमारास पोलीस वसाहतीसमोर चंदगड फाटा ते चंदगड या राज्यमार्गावर हा अपघात घडला. या अपघातात ज्ञानेश्वर कांबळे (वय.23) हा जागीच ठार झाला. तर मोटरसायकलच्या मागे बसलेला गौतम भगवान कांबळे (वय.22) हा बेळगावच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुध्दा रात्री उशिरा मृत्युमुखी पडला.
या घटनेने बेधुंदपणे बेदरकार वाहने चालविल्यामुळे कसे जीवावर बेतते, हे अधोरेखित झाले आहेत. रस्त्यात इतके प्रचंड खड्डे आहेत की भरधाव गाडी चालवण्यासारखी रस्त्याची परिस्थितीच नाही. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी भरधाव वेगाने गाडी चालविल्याने ही दुर्घटना घडली. या अपघाताची वर्दी अरूण जानबा कांबळे यांनी चंदगड पोलीसात दिली असून तपास सहाय्यक फौजदार श्री. मुजावर करीत आहेत.