चार मोटारसायकली जप्त, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहर आणि परिसरात मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला यश आले आहे. पोलिसांनी खटाव येथे छापा टाकून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्यांमध्ये शंकर परसू नाईक वय 22, रा. लक्ष्मी मंदिराजवळ खटाव, महादेव नागाप्पा नाईक (वय 22) आणि प्रशांत संजय नाईक (वय 22, दोघे रा. येडलगी, ता. अथणी) या तिघांचा समावेश आहे. हे तिघेजण मिरज शहर आणि ग्रामीण भागात मोटरसायकल चोरून खटाव येथे लक्ष्मी मंदिराच्या जवळ राहणाऱ्या शंकर नाईक यांच्या घरा शेजारी लावत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
खटाव येथे शंकर नाईक त्या व्यक्तीच्या घरात अनेक मोटरसायकली उभ्या करून ठेवल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खटाव येथे छापा टाकला असता तेथे चार मोटरसायकली मिळून आल्या. सदर मोटरसायकलीच्या कागदपत्राबाबत शंकर नाईक याच्याकडे चौकशी केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता शंकर नाईक व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी मिरज शहर आणि ग्रामीण भागात मोटरसायकली चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी 4 मोटारसायकली जप्त केले असून तिघांना अटक केली आहे.