हिरेबागेवाडी जवळील घटना, वाहन घसरल्याने अपघात
प्रतिनिधी/ बेळगाव
कोल्हापूरहून हल्याळकडे जात असताना दुचाकीसमोर कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात महिला ठार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तर या अपघातात दोन लहान मुले जखमी झाली आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील हिरेबागेवाडीनजीक हा अपघात घडला.
रेखा मष्णू कोळेकर (वय 25, रा. बिद्रोळी, ता. हल्याळ, जि. कारवार) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तर या अपघातात तिची मुले स्नेहल (वय 3) आणि अभी (वय 2) ही जखमी झाली आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी मष्णू दुर्गाणी कोळेकर (वय 32) हा आपल्या पत्नी व मुलांसह मोटारसायकलवरुन आपल्या गावी हल्याळकडे निघाला होता. यावेळी हिरेबागेवाडीनजीक कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकलची धडक कुत्र्याला बसली. त्यामुळे मोटारसायकल घसरुन मागे बसलेल्या रेखा या रस्त्यावर कोसळल्या तर मुलेही एका बाजूला पडली. रेखा यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला तर या घटनेत दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत मष्णू हा किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.