तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
मोटारसायकल वरुन डबल सीट पानगाव ता. बार्शी कडे चाललेल्या दोन युवकांची ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक लागुन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ११मार्च रोजी सायंकाळी १०.३० च्या सुमारास टेंभुर्णी-कुर्डुवाडी रोडवरील अंबाड ता. माढा येथील गाडे वस्तीनजीक घडली. याबाबत पोपट सावंत रा. बोरवली यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजित पोपट सावंत (वय २०) व अक्षय विनोद गोरखे (वय २४) दोघेही रा. वाघोली पुणे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजित पोपट सावंत (वय २०) व त्याचा मित्र अक्षय विनोद गोरखे (वय २४ दोघेही रा.वाघोली, पुणे) हे मोटारसायकल क्रमांक एमएच १२आरबी २५२० वरुन पानगाव ता. बार्शी येथे आजोबांच्या वर्षश्रध्दाला उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. रात्री १०.३० च्या सुमारास टेंभुर्णी-कुर्डूवाडी रोडवरील अंबाड ता. माढा गावच्या हद्दीत गाडे वस्तीजवळ आले असता कुर्डूवाडीकडे कडबा घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातांमध्ये मोटारसायकल वरील दोन युवकांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर, टेल लॅम्प, इंडीकेटर नसल्यानेच हा अपघात झाला. ट्रॅक्टर चालक सुर्यकांत नामदेव कुटे रा. टेभुर्णी यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.