ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअमबाहेर उभारण्यात आलेली कमान आज दुपारी अचानक कोसळली.
डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून दोन दिवसीय भारत दौऱयावर आहेत. दरम्यान, जगातील सर्वात मोठय़ा मोटेरा स्टेडिअममध्ये ट्रम्प यांचा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम होत आहे. अहमदाबादमध्ये या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना येण्यासाठी उभारलेली कमान आज दुपारी अचानक कोसळली. अचानक सोसाटय़ाचे वारे सुटल्याने ही कमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मागील महिनाभरापासून अहमदाबादमध्ये ट्रम्प यांच्या स्वागताची लगबग सुरू आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱयाच्या पार्श्वभूमीवर मोटेरा स्टेडिअममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोटेरा स्टेडिअमला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.