मुंबई \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून महिन्यात घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.
या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
कोरोनाचा कहर वाढत असताना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. यानंतर अमित देशमुख यांनी ७२ तासांत यासंबंधी निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करून परिक्षांसंदर्भात पुढील ७२ तासात निर्णय घेऊ असं ते म्हणाले होते.